पळून कुठे जाल? दहशतवादी लतीफ भटला ढगात पोहोचवताच पोलिसांचा एका ओळीचा मेसेज

लष्कर-ए-तोयबाचा कमांडर लतीफ भटचा जम्मू-काश्मीरमध्ये एन्काउंटर करण्यात आला, ज्यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. सीआरपीएफवर झालेल्या हल्ल्यात तो सामील होता. या मोठ्या कारवाईनंतर, जम्मू-काश्मीर पोलिसांनी "पळून कुठे जाल? लपू शकत नाही!" असा सूचक संदेश दिला, जो दहशतवाद्यांसाठी स्पष्ट इशारा आहे.

पळून कुठे जाल? दहशतवादी लतीफ भटला ढगात पोहोचवताच पोलिसांचा एका ओळीचा मेसेज
Latif Bhat
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 12:30 PM

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या चौकीवर हल्ला करणारा लश्करचा कमाांडर लतीफ भटचा एन्काउंटर करण्यात आला आहे. लतीफ मशीदमध्ये लपला होता. मशिदीतून बाहेर पडताच त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी ढगात पोहोचवले. त्यामुळे दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. या मोठ्या कामगिरीनंतर सीआरपीएफचे डीजी ज्ञानेद्र प्रताप सिंह यांनी अत्यंत रोचक पोस्ट केली आहे. सहकाऱ्यांनो अभिनंदन. काही पदार्थ कडकडत्या थंडीतच वाढणं चांगलं असतं. हिवाळ्यातील या बेस्ट डिशेज असतात, अशी पोस्ट ज्ञानेद्र प्रताप सिंह यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. दुसरीकडे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तुम्ही पळून जाऊ शकता, पण लपू शकत नाही, असा सूचक इशाराच जम्मू-काश्मीर पोलिसांनी पोस्टमधून दिला आहे.

आज पहाटे मशिदीत नमाज सुरू होण्याच्या आधीच दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू झाली होती. सोमवारी दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील लारू बायपास परिसरात सुरक्षा दलाने उमर निसार डार नावाच्या दहशतवाद्याला कंठस्नान घातलं होतं. 11 नोव्हेंबर रोजी कुलगाममध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात सामिल झालेल्या दहशतवाद्यांपैकी डार एक होता. तर त्यानंतर लतीफ भट फरार झाला होता.

Loading...

 

दोघांचा हल्ला, तीन जवान शहीद

11 नोव्हेंबर रोजी भट आणि डार यांनी हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले होते. त्यानंतर सुरक्षा दलाने सर्च मोहीम हाती घेतली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने दक्षिण जम्मू काश्मीरच्या देवसर परिसरातील जांगलपोरा येथे झाडाझडती सुरू केली होती. भटला घेराव घातल्यानंतर त्याला शरणागती पत्करण्याची संधीही देण्यात आली होती. पण त्याने शरणागती पत्करण्यास मनाई केली होती. तो मशिदीत लपला होता. त्यामुळे मशिदीतून न घुसण्याचा निर्णय जवानांनी घेतला. भटची बाहेर येण्याची वाट पाहत होते. त्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही वेळाने भट जेव्हा बाहेर आला, तेव्हा त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. त्यामुळे तो जागीच ठार झाला.

 

ब्रेड बनवायचा, अचानक फरार

डारने भटला सुमारे सहा महिने लपण्यासाठी आश्रय दिला होता. तसेच त्याला पाहिजे त्या सुविधाही पुरवल्या होत्या. काही दिवसांपूर्वी दोघांनी मिळून सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. त्यापूर्वी दोघांनी रेकी केली होती. डार हा पूर्वी ब्रेड बनवण्याचं काम करत होता. तो हरवला असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी दिली होती. पण तो पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लश्कर ए तोयबाशी संबंधित द रजिस्टेंस फ्रंटमध्ये सामील झाला होता. मात्र, सोमवारी तो सुरक्षा जवानांच्या चकमकीत ठार झाला. त्यापाठोपाठ आज भटही मारला गेला. त्यामुळे दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. या एन्काउंटरनंतर जम्मू- काश्मीर पोलिसांनी एका ओळीचं ट्विट करून दहशतवाद्यांना सूचक इशारा दिला आहे. तुम्ही पळून जाऊ शकता, पण अधिक काळ लपून राहू शकत नाही, असा सूचक इशाराच दहशतवाद्यांना देण्यात आला असून हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us