Night curfew : गुजरातच्या चार शहरात, तर मध्य प्रदेशात भोपाळ आणि इंदोरमध्ये नाईट कर्फ्यू, 8 शहरांत निर्बंध

| Updated on: Mar 16, 2021 | 7:24 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा हाहा:कार उडाला असतानाच आता आजूबाजूच्या राज्यांमध्येही कारोनाने पुन्हा पाय पसरायला सुरुवात केली आहे (Night curfew in Gujarat and Madhya Pradesh).

Night curfew : गुजरातच्या चार शहरात, तर मध्य प्रदेशात भोपाळ आणि इंदोरमध्ये नाईट कर्फ्यू, 8 शहरांत निर्बंध
प्रातिनिधिक छायाचित्रं
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा हाहा:कार उडाला असतानाच आता आजूबाजूच्या राज्यांमध्येही कारोनाने पुन्हा पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या गुजारातमधील चार मोठ्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील महत्त्वाच्या अशा भोपाळ आणि इंदोर या दोन मोठ्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील आठ शहरांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत (Night curfew in Gujarat and Madhya Pradesh).

मध्य प्रदेशातील शहरांध्ये 17 मार्चपासून नाईट कर्फ्यू

मध्य प्रदेशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे प्रशासनाने राज्यातील भोपाळ आणि इंदोर या दोन मोठ्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नाईट कर्फ्यू 17 मार्चपासून म्हणजेच उद्यापासून लागू करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील जबलपूर, ग्वालियर, उज्जैन, रतलाम, बुरहानपूर, छिंदवाडा, बेतूल, खारगौन या आठ शहरांमध्ये कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या आठ शहरांमध्ये भाजी मंडई किंवा बाजारांना रात्री आठ नंतर सुरु ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुढील आदेश येईपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मध्य प्रदेशात कोरोनाची परिस्थिती काय?

मध्य प्रदेशातही कोरोना रुग्णांची संख्या आता हळूहळू वाढू लागली आहे. राज्यात काल (15 मार्च) दिवसभरात 797 नवे कोरोनाबाधित आढळले होते. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 69 हजार 391 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यात 3890 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

गुजरातच्या चार बड्या शहरांत 31 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू

गुजरातच्या चार बड्या शहरातही नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा कर्फ्यू या आधीच लावण्यात आलेला आहेत. मात्र, प्रशासनाने आजपासून दोन तासांचा नाईट कर्फ्यू वाढवला आहे. त्यामुळे अहमदाबाद, बडोदा, सूरत आणि राजकोट या चार शहरांमध्ये रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. हा नाईट कर्फ्यू 31 मार्चपर्यंत असणार आहे. या नाईट कर्फ्यूची वेळ याआधी रात्री बारा ते सकाळी सहा अशी होती. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने दोन तासांचा कर्फ्यू वाढवण्यात आला आहे.

गुजरातमध्ये कोरोनाची परिस्थिती काय?

गुजरातमध्ये सोमवारी (15 मार्च) 890 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 79 हजार 97 वर पोहोचला आहे. कोरोनाबाधितांचा वारंवार वाढता आकडा लक्षात घेऊन गुजरात सरकारने महत्त्वाच्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : बीड जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू, सायंकाळी 7 ते सकाळी 7 कर्फ्यू, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात काय काय?