महंत स्वामी महाराज हे आध्यात्मिक प्रेरणेचे स्त्रोत, 92 व्या जयंतीनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

महंत स्वामी महाराजांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त देवेंद्र फडणवीस आणि पियुष गोयल यांनी त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा गौरव केला असून, याच सोहळ्यात विद्यार्थ्यांनी जागतिक विक्रमही प्रस्थापित केला आहे.

महंत स्वामी महाराज हे आध्यात्मिक प्रेरणेचे स्त्रोत, 92 व्या जयंतीनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
Mahant Swami Maharaj
| Updated on: Feb 04, 2026 | 11:31 AM

जगभरातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आणि BAPS स्वामीनारायण संस्थेचे सहावे आध्यात्मिक प्रमुख पूज्य महंत स्वामी महाराज यांची आज ९२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या निमित्ताने गुजरातच्या अटलादरा येथे अक्षराक्षरम् हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांनी हिंदू धर्मग्रंथाचे पठण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. या ऐतिहासिक क्षणी देशातील प्रमुख नेत्यांनी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आज २ फेब्रुवारी रोजी, वडोदरा जवळील अटलादरा येथे BAPS इंटरनॅशनल स्टुडंट्स फोरमच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी एकाच सुरात हिंदू धर्मग्रंथाचे (सत्संग दीक्षा) सामूहिक पठण केले. हे जगातील सर्वात मोठे सामूहिक पठण ठरले आहे. याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. या विक्रमाने महोत्सवाच्या आनंद द्विगुणित झाला आहे.

राष्ट्रीय नेत्यांकडून शुभेच्छा संदेश

BAPS स्वामीनारायण संस्थेचे सहावे आध्यात्मिक प्रमुख पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या जंयतीनिमित्त अनेक राष्ट्रीय नेत्यांकडून शुभेच्छा संदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एक ट्वीट करत महाराजांच्या आध्यात्मिक प्रवासावर प्रकाश टाकला आहे. “सेवा, संयम, त्याग आणि करुणा यांचे जिवंत उदाहरण असलेल्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जगभरात ७०० हून अधिक मंदिरांची निर्मिती झाली आहे. भारत आणि परदेशातील ३६० हून अधिक सुशिक्षित तरुणांनी संन्यास घेऊन समाजसेवेचा संकल्प केला आहे. त्यांच्या ५ लाखांहून अधिक हस्तलिखित पत्रांनी समाजाला सुसंस्कृत आणि निर्भय जीवन जगण्याची प्रेरणा दिली आहे, असे पियुष गोयल म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराजांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या ९२ व्या जन्मजयंती महोत्सवानिमित्त माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या काळातील एक आदरणीय आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून त्यांनी जगभरात ७०० हून अधिक मंदिरांसाठी प्रेरणा दिली आहे. तसेच ३६० हून अधिक सुशिक्षित तरुणांना संत दीक्षेसाठी प्रवृत्त केले आहे. पाच लाखांहून अधिक हस्तलिखित अक्षरांच्या माध्यमातून केलेले लेखन आणि कौटुंबिक, सामाजिक मूल्यांवरील त्यांचे वैयक्तिक मार्गदर्शन समाजाला मूल्यधिष्ठित करण्यासाठी सतत बळ देत आहे. विशेष म्हणजे, आज २ फेब्रुवारी रोजी गुजरातच्या अटलादरा येथे BAPS च्या इंटरनॅशनल स्टुडंट्स फोरमद्वारे एकाच वेळी हिंदू धर्मग्रंथांचे पठण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात आला आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराजांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. सेवा, साधेपणा, शिस्त आणि करुणेने भरलेले त्यांचे जीवन जगभरातील लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेली मंदिरे, सुशिक्षित तरुणांचा सेवाप्रवास आणि कुटुंब व समाजासाठी त्यांनी दिलेले स्पष्ट आणि व्यावहारिक संदेश आजही लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहेत. पूज्य महाराज दीर्घायुषी होत आणि त्यांचा आशीर्वाद समाजाला मानवता, सद्भावना आणि लोककल्याणाच्या मार्गावर पुढे नेत राहो, हीच प्रभू चरणी प्रार्थना, असे ओम बिर्ला म्हणाले.

दरम्यान महंत स्वामी महाराजांनी आपल्या कार्यकाळात केवळ आध्यात्मिक प्रबोधनच केले नाही, तर तरुणांना व्यसनमुक्ती, शिक्षण आणि समाजसेवेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध सेवा प्रकल्प आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.