Jui Gadkari : ठरलं तर मग बंद करा, उगाच… चाहत्याच्या कमेंटवर संतापली जुई गडकरी; थेट म्हणाली, एवढ्या लोकांची कमाई…
Jui Gadkari Post : सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका चर्चेत आहे. अशातच जुई गडकरीच्या एका चाहत्यानं मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. यावर जुई संतापली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेनं टीआरपीच्या शर्यतीतही अनेकदा बाजी मारली आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका नेहमीच चर्चेत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील कथानकावर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच मालिका बंद करण्याची मागणी करणाऱ्या एका नेटकऱ्याला जुई गडकरीने दिलेलं उत्तर चर्चेचा विषय ठरलं आहे.
सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायली आणि प्रियाच्या बाळांच्या जन्मानंतरची गोष्ट दाखवण्यात येत आहे. दोघींनाही मुलगी झाली असून, या दोन्ही बाळांभोवती मालिकेचं कथानक फिरताना दिसत आहे. मात्र, प्रिया सायलीच्या बाळाची अदलाबदल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. हॉस्पिटलसारख्या ठिकाणी एवढी मोठी घटना घडत असताना डॉक्टर, नर्स किंवा इतर कोणाचंही लक्ष कसं जात नाही, असा प्रश्न प्रेक्षक उपस्थित करत आहेत. मालिकेच्या प्रोमोखालील कमेंट्समध्येही अनेकजण कथानकावर टीका करताना दिसत आहेत. काही प्रेक्षकांनी तर मालिकेतील प्रसंग अतिशयोक्तीपूर्ण असल्याचं म्हटलं आहे.अशातच जुई गडकरीनं ‘आस्क मी सेशन’ घेतलेलं. यादरम्यान अभिनेत्रीला मालिका बंद करा, असं सांगण्यात आलं. त्यावर जुईनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
जुई गडकरीची पोस्ट
‘माफ करा पण आता सिरीयल बंद करा विनाकारण ताणली जातेय’ असं युजरनं म्हटलं. यावर जुई म्हणाली की, ‘तुम्हाला हे बोलायला सोपं वाटतंय. पण एक मालिका सुरू असते तेव्हा शंभर तंत्रज्ञांचे संसार त्यावर चालतात. कित्येक कलाकारांची घर त्यावर चालत असतात. प्रेक्षक म्हणून तुला आवडत नसेल तर नको बघू. प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय बघायचं, याचा चॉईस आहे आणि आम्हाला तो पूर्णपणे मान्य आहे. पण एक प्रोजेक्ट बंद झाला तर एवढ्या लोकांची कमाई थांबते हो…हा विचार करा.’

दरम्यान, जुई गडकरीनं केलेली ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
