Manipur Viral Video : माझ्या मनात प्रचंड राग, गुन्हेगारांना सोडणार नाही; पंतप्रधानांचा संतप्त इशारा; मणिपूरच्या व्हिडीओची घेतली गंभीर दखल

4 मे रोजी मैतेई समुदायातील शेकडो लोक हत्यारे घेऊन कांगकोपकी जिल्ह्यातील के बी फाईनोम गावात शिरले होते. या लोकांनी गावात घुसताच घरेदारे जाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे तीन महिला भीतीने जंगलाच्या दिशेने पळाल्या.

Manipur Viral Video : माझ्या मनात प्रचंड राग, गुन्हेगारांना सोडणार नाही; पंतप्रधानांचा संतप्त इशारा; मणिपूरच्या व्हिडीओची घेतली गंभीर दखल
pm narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 20, 2023 | 12:56 PM

नवी दिल्ली | 20 जुलै 2023 : मणिपूर येथे दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गुन्हेगरांना कठोर सजा ठोठावण्याची मागणीही होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या व्हिडीओची गंभीर दखल घेतली आहे. मोदी या व्हिडीओवरून संतप्त झाले आहेत. माझं हृदय वेदनेनं भरून गेलं आहे. माझ्या मनात प्रचंड राग आहे. मुलींबाबत जे काही घडलंय त्यामुळे संपूर्ण देशाची मान खाली गेली आहे. ज्यांनी कुणी हे कृत्य केलंय त्यांना सोडणार नाही. त्यांना कठोर सजा देऊ, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाला सामोरे जाण्यापूर्वीच पंतप्रधानांनी मीडियाशी संवाद साधला. पाप करणारे कोण आहेत? किती लोक आहेत? ते आहेत तिथेच आहेत, पण अशा घाणेरड्या कृत्याने देशाची इज्जत जात आहे. 140 कोटी लोकांची मान लाजेने खाली गेली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करा. कठोर पावलं उचला. घटना राजस्थानची असो, छत्तीसगडची असो की मणिपूरची. कायदेशीर कारवाई होईलच. स्त्रीयांचा नेहमीच सन्मान राहिला पाहिजे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, कायदा आपलं काम पाहिलंच, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

निर्वस्त्र करून अत्याचार

सोशल मीडियावर मणिपूर येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत काही लोक दोन महिलांना निर्वस्त्र करत त्यांचं शोषण करत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ 4 रोजीचा असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे मणिपूरमधील हिंसा सुरू झाल्यानंतरचा हा व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडीओ कांगपोकपी जिल्ह्यातील आहे.

या महिलांवर गँगरेप झाल्याचं सांगितलं जात आहे. या महिला ओरडत आहेत. किंचाळत आहेत. तर लोक त्यांना ओढत ओढत शेतात नेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ आल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट पसरली आहे. पंतप्रधानांनी या प्रकरणी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

 

त्या किंचाळत होत्या

मीडिया वृत्तानुसार, 4 मे रोजी मैतेई समुदायातील शेकडो लोक हत्यारे घेऊन कांगकोपकी जिल्ह्यातील के बी फाईनोम गावात शिरले होते. या लोकांनी गावात घुसताच घरेदारे जाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे तीन महिला भीतीने जंगलाच्या दिशेने पळाल्या. त्यानंतर या जमावाने या महिलांचा पाठलाग करत त्यांना घेरलं. या लोकांनी महिलांना निर्वस्त्र होण्यास भाग पाडलं.

त्यानंतर त्यांच्यासोबत सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार सुरू असताना त्या महिला किंचाळत होत्या. मदतीची याचना करत होत्या. गयावया करत होत्या. पण कुणीच त्यांच्या मदतीला आले नाही. या प्रकरणी 4 मे रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.