काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या बीआरएसच्या 10 आमदारांचं सदस्यत्व जाणार?

बीआरएस 10 सदस्यांच्या पक्षांतरामुळे सभागृहातील काँग्रेसचे संख्याबळ 75 वर पोहोचले आहे. या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज बीआरएसने सभापतींसमोर दाखल केला आहे.

काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या बीआरएसच्या 10 आमदारांचं सदस्यत्व जाणार?
| Updated on: Jul 16, 2024 | 9:01 PM

आणखी एका राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. कारण भारत राष्ट्र समितीच्या दहा आमदारांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मंगळवारी तेलंगणा विधानसभेचे अध्यक्ष जी. प्रसाद कुमार यांच्याकडे काँग्रेसमध्ये सामील झालेल्या 10 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली. बीआरएसचे कार्याध्यक्ष केटी रामाराव आणि इतर आमदारांनी विधानसभेत सभापतींना निवेदन दिले. रामाराव म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी या याचिकेवर लक्ष घालून कायदा आणि संविधानातील तरतुदींनुसार निर्णय घेऊ असे आश्वासन दिलंय.

केटी रामाराव म्हणाले की, आमचा अजूनही विधानसभा अध्यक्षांवर विश्वास आहे. तसा निर्णय घेईल अशी आशा आहे. जर त्यांनी तसे केले नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ.’

रामाराव यांनी आरोप केला की लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संविधानाच्या रक्षणाचे मोठे दावे करतात. पण पक्ष बदललेल्या आमदारांच्या पाठीवर थाप मारत आहेत. BRS शिष्टमंडळाने विधानसभेच्या अध्यक्षांकडे अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल आणि विरोधी पक्षाच्या आमदारांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल ही तक्रार केली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आले होते. आता बीआरएसच्या 10 आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 10 बीआरएस आमदारांव्यतिरिक्त, सहा आमदारांनीही पक्ष बदलून काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. बीआरएसवरील टीकेला उत्तर देताना काँग्रेस नेत्यांनी यापूर्वी के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला पक्षांतराबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असे म्हटले आहे. कारण BRS ने सत्तेत असताना इतर पक्षांतील आमदारांनाही पक्षात सामील करून घेतले होते.

गेल्या वर्षी झालेल्या 119 सदस्यीय विधानसभा निवडणुकीत बीआरएसला 39 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 64 जागा मिळाल्या होत्या.  सिकंदराबाद कॅन्टोन्मेंटमधून निवडून आलेल्या बीआरएस सदस्य जी लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला, त्यामुळे सभागृहातील सदस्यांची संख्या 65 झाली.