
अमेरिका भारतावर सातत्यानं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. भारत रशियाकडून तेल खेरदी करतो म्हणून गेल्या ऑगस्ट महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली होती. त्यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला होता. त्यामुळे आता अमेरिकेत भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. हा अमेरिकेकडून भारतावर लावण्यात आलेला आतापर्यंतचा सर्वात जास्त टॅरिफ आहे. दरम्यान या टॅरिफचा मोठा परिणाम हा निर्यातीवर झाल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेला भारताकडून ज्या वस्तू निर्यात होत होत्या, त्याचं प्रमाण कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. याचा काही प्रमाणात फटका हा निर्यातदारांना बसला आहे. मात्र हा फटका जसा भारताला बसला आहे, तसाच तो अमेरिकेला देखील बसला आहे. भारताकडून होणाऱ्या वस्तूंची निर्यात कमी झाल्यानं अमेरिकेमध्ये महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे, अमेरिकेत अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. दरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून, अमेरिकेतूनच आता भारताविरोधातील टॅरिफ मागे घ्यावा अशी मागणी होऊ लागली आहे. तर दुसरीकडे भारतासाठी समाधानाची बाब म्हणजे अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारताची रशिया आणि चीनमध्ये होणारी निर्यात वाढली आहे.
एकीकडे अमेरिकेचा टॅरिफ दबाव असतानाच आता भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे, वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतावर आणखी एका देशाचा टॅरिफ लागू झाला आहे. ज्या देशांसोबत मुक्त करार (FTA) नाही अशा देशांवर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच मॅक्सिकोने केली होती. त्यानुसार आता एक जानेवारी 2026 पासून मॅक्सिकोचा टॅरिफ लागू झाला आहे, आशिया खंडातील अनेक प्रमुख देशांवर मॅक्सिकोने टॅरिफ लावला आहे, यामध्ये भारत, चीनसह अनेक देशांचा समावेश आहे. दरम्यान या टॅरिफचा मोठा फटका आता भारताच्या निर्यातीला बसण्याची शक्यता आहे. मॅक्सिकोकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे.
निर्यातदारांमध्ये चिंता
दरम्यान मॅक्सिकोने भारतावर टॅरिफ लावल्यामुळे निर्यातदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे, एकीकडे अमेरिकेचा टॅरिफ कायम असताना आता मॅक्सिकोने देखील टॅरिफ लावल्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र याचा भारतावर नेमका किती परिणाम होणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल.तर दुसरीकडे समाधानाची बाब म्हणजे अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर आता भारताला दोन मोठ्या बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्यानंतर भारताची चीन आणि रशियात होणारी निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली असून, भारताची रशिया आणि चीनसोबत वाढलेली जवळीकता अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे.