
लोकसभा निवडणुकीच्या 7 व्या आणि अखेरच्या टप्प्याचा प्रचारही थांबला आहे. आता 1 जूनला मतदान होणार आहे. 1 जूनला मतदान झाल्यानंतर 4 जूनला निकाल लागेल. त्यामुळे सगळ्याचं पक्षांची धाकधूक आता वाढली आहे. 7 व्या टप्प्यात एकूण 57 जागांवर मतदान होणार आहे. ज्यात उत्तर प्रदेशच्या 13 जागा, पंजाबच्या सर्व 13 जागा, पश्चिम बंगालच्या 9 जागा, बिहारच्या 8 जागा, ओडिशा 6, हिमाचल प्रदेशच्या 4 जागा, झारखंड 3 आणि चंदीगडमध्ये मतदान होणार आहे.
शेवटच्या टप्प्याचं वैशिष्ट्य म्हणजे, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात मतदान आहे. शेवटच्या टप्प्यात पुजापाठ सह मोदींनी रोड शो आणि सभाही घेतल्या. मोदींच्या विरोधात वाराणसीतून काँग्रेसचे उमेदवार अजय राय उभे आहेत.
अजय राय हे उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. अजय राय भाजपकडून तीनदा आमदार राहिलेले आहेत ते समाजवादी पार्टीतही होते. अजय राय यांची वाराणसीच्या जागेवर पराभवाची हॅट्ट्रिक झालीये.
2019 मध्ये वाराणसीत तिहेरी लढत झाली होती. पण यावेळी यूपीत काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची आघाडी आहे आणि आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना 6 लाख 74 हजार 664 मतं मिळाली होती. समाजावादी पार्टीच्या शालिनी यादव दुसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यांना 1 लाख 95 हजार 159 मतं मिळाली
तर काँग्रेसच्या अजय राय यांनी 1 लाख 52 हजार 548 मतं घेतली होती. आता पुन्हा अजय राय मैदानात आहेत. 4 लाख 79 हजार 505 मतांनी मोदींचा विजय झाला होता.
पण यावेळी वाराणीत काँग्रेस चमत्कार करण्याचा दावा करतेय. 4 जूनला मोदींना जनता टाटा बाय बाय करेल, असं राहुल गांधी म्हणत आहेत. तर मोदींनी इंडिया आघाडीच्या विजयासाठी पाकिस्तानाच प्रार्थना सुरु असल्याची टीका केलीये.
1 जूनला 7 व्या टप्प्याच्या मतदानात 904 उमेदवारांचा फैसला होणार आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व 6 टप्प्यातच 62 टक्क्यांच्या वरच मतदान झालं.
पहिल्या टप्प्यात 66.14% मतदान झालं, दुसऱ्या टप्प्यात 66.71 %, तिसऱ्या टप्प्यात 65.68 % मतदान झालं, चौथ्या टप्प्यात 69.16 %, पाचव्या टप्प्यात 62.02 %, तर सहाव्या टप्प्यात 63.37% मतदानाची नोंद झाली,
5 टप्प्यात 300 पार झाल्याचा दावा अमित शाह यांनी केलाय आणि 7 व्या टप्प्यात 400 पार होणार असा विश्वासही शाहांनी व्यक्त केलाय.
400 पारचा नारा घेवून मोदी ब्रिगेड मैदानात उतरली होती. पण यावेळी लढाई सोपी नाही. काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडी एकजूट प्रचारात दिसली आणि मोदींचा रथ रोखण्याचा दावा इंडिया आघाडीनंही केलाय. त्यामुळे ४ जूनलाच चित्र स्पष्ट होणार आहे.