
“भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि हे वास्तव स्वीकारण्यासाठी कोणत्याही घटनात्मक मंजुरीची किंवा कागदोपत्री पुराव्याची आवश्यकता नाही”, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. कोलकाता येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या वर्षानिमित्त आयोजित १०० व्याख्यानमाला या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात हिंदू राष्ट्राची संकल्पना, संविधानातील तरतुदी आणि संघाची कार्यपद्धती यावर सविस्तर भाष्य केले.
मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्राची तुलना नैसर्गिक सत्याशी केली. ते म्हणाले, “सूर्य पूर्वेकडून उगवतो, हे सत्य आहे. हे कधीपासून सुरू झाले हे आपल्याला माहित नसले, तरी ते मान्य करण्यासाठी आपल्याला कोणत्याही घटनात्मक मंजुरीची गरज भासत नाही. त्याचप्रमाणे हिंदुस्तान हे हिंदू राष्ट्र आहे, हे एक नैसर्गिक सत्य आहे. जोपर्यंत या मातीवर भारतीय संस्कृतीचा आदर करणारा एक व्यक्ती जिवंत आहे, तोपर्यंत हे राष्ट्र हिंदू राष्ट्रच राहील.” असे विधान मोहन भागवत यांनी केले.
“भविष्यात संसदेने संविधानात सुधारणा करून हिंदू राष्ट्र हा शब्द जोडला किंवा नाही जोडला, तरी त्याने वास्तवात फरक पडणार नाही. धर्मनिरपेक्ष (Secular) आणि समाजवादी (Socialist) हे शब्द मूळ संविधानाच्या प्रस्तावनेत नव्हते. १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे शब्द जोडले होते. संघासाठी हे शब्द महत्त्वाचे नसून, या भूमीची मूळ ओळख महत्त्वाची आहे”, असेही मोहन भागवत म्हणाले.
जन्मआधारित जातीव्यवस्था ही हिंदुत्वाची खरी ओळख नाही. जो भारताला आपली मातृभूमी मानतो आणि इथल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगतो, ज्याचा आपल्या पूर्वजांच्या महानतेवर विश्वास आहे, तो प्रत्येकजण हिंदू आहे. हीच संघाची मूळ विचारधारा आहे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.
आरएसएस हा हिंदूंच्या हिताचे रक्षण करणारा आणि कट्टर राष्ट्रवादी संघटन आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही मुस्लिम विरोधी आहोत. संघाचे काम अत्यंत पारदर्शक आहे. जर कोणाला वाटत असेल की आम्ही मुस्लिम विरोधी आहोत, तर त्यांनी प्रत्यक्ष येऊन आमचे काम पाहावे. जर तुम्हाला काही चुकीचे दिसले तर तुमचे मत कायम ठेवा, पण जर काहीच आढळले नाही तर आपले विचार बदलण्याची तयारी ठेवा, असेही आवाहन मोहन भागवत यांनी केले.