
सासू आणि सुनेचे संबंध अनेकदा घरात भांडणास कारणीभूत ठरतात. परंतू अनेकदा सासू आणि सूनेचे नाते मायलेकीचे देखील झाल्याचे पाहायला मिळत असते. अशा एका सासूने आपल्या सुनेला तिची किडनी दान करुन तिचे प्राण वाचवल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या सुनेच्या आईने किडनी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर सासूने सूनेला वाचवण्यासाठी आपली एक किडनी दान करुन तिचे प्राण वाचवल्याचे उघडकीस आले.
अनेकदा सासू आणि सूनांचे पटत नसल्याने सूना स्वतंत्र राहाण्याचा तगादा पतीकडे करताना पाहायला मिळतात. दोघींच्या भांडणात बरेचदा नवऱ्याची हालत होते. अशात एका सासूने स्वत:ची किडनी देऊन सुनेला नवीन जीवनदान दिले आहे.यातील महिलेचे ऑपरेशन लखनऊ येथील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात यशस्वीपणे पार पडले आहे. ऑपरेशननंतर सून आणि सासू यांची तब्येत सुधारत आहे.
उत्तर प्रदेशातील एटा येथे राहणारी पूजा हिची प्रकृती अनेक महिन्यांपासून बिघडत चालली होती. डिलिव्हरी दरम्यान संक्रमण झाल्याने पूजाच्या किडनी खराब झाल्या होत्या. पूजाचे काही महिन्यांपासून डायलिसिस सुरु होते. परंतू प्रकृतीत कोणताही सुधार होत नव्हता. स्थिती पाहून डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला.
डॉक्टराचा हा सल्ला असल्याचे पूजा हीने माहेरी सांगितले. त्यावेळी माहेरच्या लोकांनी तिला थारा दिला नाही. तिच्या सख्या आईने तिला किडनी देण्यास नकार दिला. त्यानंतर पूजाच्या समोर मोठे संकट उभे राहीले. त्यानंतर तिचे सासू बीनम देवी या समोर आल्या. त्यानंतर त्यांनी सून पूजा हिचा आत्मविश्वास वाढवत तिला किडनी देण्याचे मान्य केले. त्यानंतर लखनऊ येथील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात दोघींवर शस्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशननंतर बीनम देवी यांनी सांगितले की पूजाही माझ्या मुलीसारखीच आहे. तिचे प्राण वाचवणे हे माझे कर्तव्य असल्याचे बीनम देवी यांनी सांगितले.