लेकीसाठी आईने 36 वर्षे पुरुष बनून काढली, थरारक आणि डोळ्यांत पाणी आणणारी खरीखुरी ‘फिल्मी कहाणी’
एक अशी घटना समोर आली आहे. जी वाचून तुम्हाला थक्क व्हायला होईल, एक आई पोटच्या मुलीच्या सुरक्षेसाठी आयुष्यभर एका पुरुषाच्या वेशात राहून जीवन जगली. तिच्या वाटेला आलेल्या संघर्षाची ही थरारक कहाणी तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही.

आपण अनेकदा असे चित्रपट पाहतो जे आपल्या मनाचा ठाव घेऊन जातात. त्यांचे कथानक प्रेक्षक म्हणून आपल्या मनाला स्पर्शून जातात. पण भावनाविवश करणाऱ्या घटना केवळ सिनेमातच दाखवल्या जातात असं नाही, तर त्या प्रत्यक्ष जीवनातही घडतात. अशीच घटना आता तामिळनाडूत घडली आहे. यामध्ये एक आई स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी काय काय करु शकते, हे वाचून थक्क व्हायला होतं. आता ही घटना नेमकी काय? आणि का एका नवविवाहित स्त्रीवर ऐन तारुण्यात एक पुरुष बूनन आयुष्यभर जगण्याची वेळ आली.
ही कहाणी आहे मुथु मास्टर यांची. तमिळनाडूतील तूतूकुडी जिल्ह्यातील कट्टूनायक्कनपट्टीमध्ये ते राहतात. जवळपास चाळीस वर्ष या गावातल्या गावकऱ्यांनी त्यांना एका साधारण शेतकऱ्याच्या रुपातच पाहिलं. पांढरं धोतर त्यावर पांढऱ्याच रंगाचं शर्ट आणि हातामध्ये कुदळ आणि तोंडात विडी असा सगळा पेहराव पाहून ही एक महिला असेल असा कोणी कधी विचारही करु शकणार नाही, अन् हेच मुथु मास्टर यांच्याबाबत झालं. पण या सगळ्या पेहरावामागे त्यांची संघर्षमय कहाणी.
पेचियम्माल हीचं शिव या तरुणाशी लग्न झालं. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच नवऱ्याचं ऱ्हदयविकाराने निधन झालं. नशिबाचा क्रूर फेरा असा की, त्यानंतर दोनच दिवसांत आपण गरोदर असल्याचे पेचिय्यमालला कळाले. त्यामुळे एवढं मोठं दुःख पचवून आयुष्याला सामोरे जाण्याचा निर्णय तिने घेतला. पण हा निर्णय अजिबात सोपा नव्हता. नऊ महिन्यांनंतर गोंडस मुलीचा जन्म झाला. 15च दिवसांत सगळं आयुष्य बर्बाद झाल्यानंतर मुलीकडे पाहून जगण्याची उमेद तिला मिळाली. पण खरा खडतर संघर्ष आता सुरु झाला होता. कारण आता पेचिय्यमाला ही कोणाचाही आसरा नसलेली ही एकल विधवा महिला होती. मुलीच्या संगोपणासाठी आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी तिने कोळश्याच्या खाणीमध्ये कामाला सुरुवात केली. पण इथेच तिच्यावर एका संध्याकाळी ट्रकचालकाकडून बलात्काराचा प्रयत्न झाला. त्या थरारक प्रसंगातून कशीबशी वाचली.
पण त्याच दिवशी पेचिय्यमाला स्वतःच्या मुलीचाही विचार आला. तिच्या सुरक्षेचा विचार आला. त्याक्षणी तिने ठरवलं की, या दुनियेसोबत दोन हात करण्यासाठी एक पुरुष बनून राहायचे. मुथु बनण्याअगोदर तिरुचेवूर मंदिरात गेली तिथेच ती एकदा शेवटची स्त्री म्हणून दिसली होती. तिथे तिने मुंडन केलं. तिथेच पेच्चियमाला तिने कायमचं संपवलं आणि मुथुचा जन्म झाला. पण सगळ्यात मोठा प्रश्न होता मासिक पाळीचा. मासिक पाळी संपवण्यासाठी तिने अनेक ओषधींचं सेवन केलं. त्यामुले तिला प्रचंड त्रासालालही सामोरे जावे लागले. त्यामुळे चाळीशीत पोहचण्यापूर्वीच तिची मासिक पाळीही संपली.
विडी- सिगारेट हा सगळा फक्त दिखाव्यासाठी तिने वापर केला. पण साधारणपणे एका पुरुषाचं जीवन जगताना तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. सार्वजनिक ठिकाणी पुरुषांच्या शौचालयांचा वापर करणं असेल किंवा त्यांच्यासोबत उठबस करणं हे सगळं काही दिवसांत तिला नित्याचं झालं होतं. मुथु म्हणून ती इतका खरा पुरुष दिसू लागली की, अनेकदा खऱ्या पुरुषांनीही तिला या वस्तू मागितल्या.
सगळ्यात महत्त्वाचं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या स्वतःच्या मुलीसाठी पेचियम्माने हे सगळं केलं तिलाही सात वर्षांची होईपर्यंत हे माहिती नव्हतं की मुथु तिची आई आहे. षण्मुगासुंदरी ही तिच्या मावशीलाच स्वतःची आई समजत असे. ती 10 वर्षांची झाल्यापासून आईसोबत राहत आहे आणि आता तीही आईला मुथु मास्टर म्हणूनच हाक मारते.