व्यसनमुक्त असणाराच खरा सत्संगी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र

देशभरातील 10,000 हून अधिक ठिकाणांहून युवक, MY भारत स्वयंसेवक, NSS स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच 125 पेक्षा अधिक आध्यात्मिक संस्थांनी या कार्यक्रमात आभासी माध्यमातून सहभाग नोंदवला.

व्यसनमुक्त असणाराच खरा सत्संगी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र
pm modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 03, 2026 | 10:19 AM

दिल्लीतील स्वामिनारायण अक्षरधाम मंदिरात रविवारी “विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा” या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात दिल्ली आणि आसपासच्या भागातील हजारो युवक-युवती सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता भगवानांच्या मंगलमय धून आणि प्रार्थनेने झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून उपस्थित युवकांना संबोधित करत व्यसनमुक्त जीवन स्वीकारण्याचे आवाहन केले. यावेळी केंद्रीय पर्यटन व संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हेही उपस्थित होते.

देशभरातील बीएपीएस (BAPS) संस्थेच्या सर्व प्रमुख केंद्रांवरही या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे वरिष्ठ संत पूज्य ईश्वरचरणदास स्वामी यांनी युवकांना प्रेरित करत सांगितले, “भगवान स्वामिनारायणांनी आपल्याला व्यसनमुक्त जीवन जगण्याची आज्ञा दिली आहे. जो व्यसनमुक्त असतो तोच खरा सत्संगी बनतो.” त्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी या अभियानासाठी युवकांना प्रेरणा देत आहेत. त्यामुळे सर्वांनी उत्साहाने आणि प्रेमाने या अभियानात सहभागी व्हावे.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी बीएपीएसच्या युवा उपक्रमाचे कौतुक करत युवकांना सर्जनशील कार्यासाठी प्रेरित केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून युवकांना संबोधित केले. विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, व्यसनमुक्त भारत घडवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

देशभरातील 10,000 हून अधिक ठिकाणांहून युवक, MY भारत स्वयंसेवक, NSS स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच 125 पेक्षा अधिक आध्यात्मिक संस्थांनी या कार्यक्रमात आभासी माध्यमातून सहभाग नोंदवला.

भगवान स्वामिनारायणांच्या काळापासूनच त्यांच्या 3,000 हून अधिक संत-परमहंसांनी गावोगावी भ्रमण करून लोकांना व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा दिली. प्रमुखस्वामी महाराजांनी ही परंपरा पुढे नेत आपल्या आयुष्यात 50 लाखांहून अधिक लोकांना व्यसन सोडून पवित्र जीवन स्वीकारण्याची प्रेरणा दिली. यामध्ये शेतकरी, आदिवासी समाज, व्यापारी तसेच युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

बीएपीएसचे व्यसनमुक्ती अभियान

1997: गुजरातमधील विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये व्यसनमुक्ती शिबिरांचे आयोजन करण्यात आले. हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्यात आले. तसेच, चलित व्यसनमुक्ती प्रदर्शनांद्वारे (मोबाइल डी-अॅडिक्शन प्रदर्शन) जनजागृती करण्यात आली. अनेकांनी व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेतली.

2000: 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांनी 2,500 गट तयार करून गुजरात, मुंबई, कोलकाता आणि इतर राज्यांमध्ये घराघरांत जाऊन व्यसनमुक्त जीवनाचा संदेश दिला. त्यानंतर लाखो लोकांनी गुटखा, अमली पदार्थ, धूम्रपान आणि मद्यपान सोडण्याचा लेखी संकल्प केला.

2007: देशभरातील 23,000 बालक आणि युवकांनी व्यसनमुक्ती अभियानांतर्गत 21 लाख लोकांशी संपर्क साधला. त्यापैकी 6.30 लाख लोकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती भवनात बीएपीएसच्या युवा कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांचा सन्मान केला.

2022: आझादी का अमृत महोत्सव आणि प्रमुखस्वामी महाराज जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात व्यसनमुक्ती अभियान राबवण्यात आले. युवकांनी लाखो लोकांना शुद्ध, पवित्र आणि व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित केले.

सध्या परम पूज्य महंतस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य लोकांनी व्यसनमुक्त जीवन स्वीकारून आपले जीवन घडवले आहे. त्यांच्या दर्शनातून आणि पवित्र जीवनातून प्रेरणा घेत अनेकजण स्वतःसाठी आणि समाजासाठी अधिक चांगले भविष्य घडवण्याचे कार्य करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us