US-Israel : इस्रायलचा पाठिराखा, मोठा भाऊ बनलेल्या अमेरिकेने आता त्यांनाच दिला झटका, अपेक्षित नव्हता असा निर्णय ट्रम्प यांच्याकडून जाहीर
US-Israel : अमेरिकेत मध्यावधी निवडणुका सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल बद्दल एक मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. खरंतर अमेरिकेसाठी इस्रायल जास्त जवळचा देश आहे. दोघांमध्ये मैत्रीपेक्षा पण घट्ट नातं आहे.

अमेरिका आणि इस्रायलचं नातं विशेष आहे. त्यांच्यात फक्त घट्ट मैत्रीच नाहीय, तर त्या पलीकडचं नातं आहे. इस्रायलच्या स्थापनेपासून अमेरिका खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभी राहिली आहे. इस्रायलला प्रत्येकवेळी आर्थिक आणि सैन्य मदतीची रसद पुरवली आहे. पण आता अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएसमध्ये मध्यावधी निवडणुका सुरु असताना या निर्णयाची घोषणा केली आहे. अमेरिकेकडून दरवर्षी इस्रायलला मोठीआर्थिक मदत दिली जाते. पण या वर्षानंतर ही मदत मिळणं बंद होणार आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू वार्षिक 4 अब्ज डॉलरची आर्थिक मदत बंद करण्याच्या निर्णयावर सहमत आहेत.
इस्रायलला पैशाची मदत देणं अमेरिका बंद करणार असली तरी, अमेरिकेची इस्रायलला शस्त्रास्त्र विक्री कायम राहणार आहे. गरज पडल्यास त्यांना मदतही करणार हे ट्रम्प यांनी स्पष्ट केलय. दोन्ही देशांमधील अनेक दशकांच्या सैन्य संबंधात बदल म्हणून या निर्णयाकडे पाहिलं जात आहे. अमेरिकेत मध्यावधी निवडणुका सुरु असताना ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. इस्रायलला आता आर्थिक मदतीची गरज नाही असं ट्रम्प म्हणाले. इस्रायलला दिल्या जाणाऱ्या मदतीवरुन रिपब्लिकन पार्टीवर सतत टीका करणाऱ्या डेमोक्रॅट्सचा तर्कही कमजोर होईल असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे.
फॉक्स अँड फ्रेंड्स शो मध्ये घोषणा
ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजच्या फॉक्स अँड फ्रेंड्स शो मध्ये ही घोषणा केली. या वर्षाच्या अखेरीस अमेरिका इस्रायलला आर्थिक मदत देणं बंद करेल. पण इस्रायलला आवश्यकता असेल तर त्यांना मदत जरुर करु असं ट्रम्प म्हणाले. ही फंडिंग कशी बंद होणार, ते ट्रम्प यांनी सांगितलं नाही. अमेरिका आणि इस्रायलमधील हा करार सप्टेंबर 2028 पर्यंत लागू आहे. या करारातंर्गत अमेरिकेकडून दरवर्षी इस्रायलला 3.8 अब्ज डॉलरची सैन्य मदत दिली जाते.
अमेरिका इस्रायलला गरजेपेक्षा जास्त मदत करते
अमेरिकेत इस्रायलवर होणारी टीका वाढत चालली आहे. इस्रायलच्या गाझामधील सैन्य मोहिमांवर डेमोक्रॅट्सकडून सातत्याने टीका केली जाते. अमेरिकेत इस्रायलच समर्थन करणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे हे अनेक सर्वेक्षणातून समोर आलय. अमेरिका मध्य पूर्वेत इस्रायलला गरजेपेक्षा जास्त मदत देते असा अनेक नागरिकांचा तर्क आहे. जून महिन्यात क्विनिपियाक यूनिवर्सिटीने एक सर्वे केला. त्यातून समोर आलं की, 48 टक्के अमेरिकन मतदार आणि 66 टक्के डेमोक्रॅट्सचं असं मत आहे की, अमेरिका इस्रायलला गरजेपेक्षा जास्त मदत करत आहे.
