अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- गडकरी

| Updated on: Dec 15, 2020 | 11:18 AM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एएनआयला मुलाखत दिली. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी समर्पित सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या सूचना आणि सल्ल्यांवर विचार करण्यास तयार आहोत, असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं आहे.

अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- गडकरी
Follow us on

नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 20वा दिवस आहे. मात्र, अद्यापही कृषी कायद्याबाबत तोडगा निघू शकला नाही. विरोधकांकडून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात येतोय. काँग्रेस नेते राहुल गांधी अधिक आक्रमक होत आहेत. अशावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आमचं सरकार हे शेतकऱ्यांसाठी समर्पित सरकार आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या सूचनांवर विचार करण्यास तयार आहोत, असं म्हटलंय. त्याच बरोबर ज्येष्ठ समाजसेवर अण्णा हजारे हे या आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नसल्याचंही गडकरी म्हणाले. (Union Minister Nitin Gadkari’s appeal to farmers)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एएनआयला मुलाखत दिली. ‘केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी समर्पित सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या सूचना आणि सल्ल्यांवर विचार करण्यास तयार आहोत. आमच्या सरकारकडून शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांनी पुढे येऊन कृषी कायदे समजून घ्यायला हवे’, असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं आहे.

त्याचबरोबर काही घटक शेतकरी आंदोलनाचा गैरफायदा घेत त्यांची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत, असा आरोपही गडकरी यांनी विरोधकांवर केलाय. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी तिनही कृषी कायदे समजून घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

‘आण्णा हजारे सहभागी होतील असं वाटत नाही’

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या आंदोलनात सहभागी होतील असं आपल्याला वाटत नाही. कारण, सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काम करत आहे. सरकारने शेतकरी विरोधात काही केलं नाही. जर संवादच झाला नाही तर गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. पण संवाद झाला तर शेतकऱ्यांना न्याय मिळून हे प्रकरण सुटेल, असा आशावादही गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

विदर्भात 10 हजार शेतकरी आत्महत्या

मी विदर्भाचा आहे. तिथे 10 हजार गरीब शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरुन कुणीही राजकारण करता कामा नये. शेतकरी संघटनांकडून ज्या सुधारणा सांगितल्या जात आहेत त्या योग्य असतील तर कृषी कायद्यात बदल करण्यास आम्ही तयार आहोत, असा दावाही गडकरी यांनी केला आहे.

शेतकरी आंदोलनाचा 20वा दिवस

दिल्लीमध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे. अशा परिस्थितीती हजारो शेतकरी आपल्या मागण्यांसाठी ठाण मांडून बसले आहेत. थंडीमुळे त्रास होत असला तरी आम्ही आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार गाझीपूर बॉर्डवरील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान आज सिंधू बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्यांची एक बैठक होणार आहे. तर उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

दिल्ली बॉर्डरवर पोहोचले हजारो शेतकरी, आज मोठ्या आंदोलनाची शक्यता

दिल्लीत हाय व्होल्टेज ड्रामा, अमित शाह यांच्या घरासमोर आंदोलनाचा प्रयत्न, आपचे नेते पोलिसांच्या ताब्यात

Union Minister Nitin Gadkari’s appeal to farmers