
देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. कोरोनाच्या नवीन व्हॅरिएंटची एन्ट्री झाली आहे. कोरोनाचा नवा व्हॅरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 चे रुग्ण देशात मिळू लागले आहे. कोरोनाच्या या व्हॅरिएंटचे रुग्ण तामिळनाडू आणि गुजरातमध्ये मिळाले आहे. INSACOG डेटामध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.
कोरोना व्हायरसच्या दोन नवीन सबव्हॅरिएंटची ओळख NB.1.8.1 आणि LF.7 अशी झाली आहे. इंडियन सार्स-कोव-2 जीनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) च्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात तामिळनाडूत NB.1.8.1 रुग्ण मिळाला. तसेच गुजरातमध्ये मे महिन्यात LF.7 चे चार रुग्ण मिळाले.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, NB.1.8 आणि LF.7 व्हॅरिएंटला ‘Variants Under Monitoring’ मध्ये ठेवण्यात आले आहे. चीन आणि आशियामधील काही भागांत या व्हॅरिएंटचे रुग्ण आढळत आहे. भारतात सध्या प्रचलित व्हॅरिएंट JN.1 आहे. तो सर्व चाचणी केलेल्या सॅम्पलमध्ये 53 टक्के आहे. त्यानंतर BA.2 (26%) आणि अन्य ओमिक्रॉन सबव्हॅरिएंट्स (20%) आहे.
ठाण्यातील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २१ वर्षीय तरुणाचा कोरोना प्रादुर्भावाने मृत्यू झाला. हा रुग्ण मुंब्रा येथे राहत होता. २२ मे साठी उपचारासाठी तो दाखल झाला होता. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला. त्याला छातीचा त्रास, डायबिटीज हे आजार होते.
दरम्यान, राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. आयसोलेटेड ऑक्सिजन असलेला बेडचा स्वतंत्र कक्ष तयार ठेवण्यात आला आहे. लहान मुलांचा विचार करुन बाल विभाग तसेच त्यांचे वॉर्ड सुद्धा सज्ज ठेवण्यात आलेला आहेत.
आरोग्य मंत्रालयानुसार, 19 मे 2025 पर्यंत देशात एकूण 257 एक्टिव्ह कोव्हीड रुग्ण होते. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. दिल्लीत मागील 24 तासांत 23 नवीन रुग्ण मिळाले आहे. आंध्र प्रदेशात 4, तेलंगानामध्ये 1 तर बंगळूरुमध्ये 9 महिन्याचा मुलगा कोरोना पॉझिटीव्ह मिळाला आहे. केरळमध्ये में महिन्यात आतापर्यंत 273 कोरोनाच्या केस मिळाल्या आहेत.