आता आठवड्यातून 3 दिवस मिळणार सुट्टी, पण रोज करावं लागणार इतके तास काम, नवीन कामगार कायद्यातील अटी काय?
नवीन कामगार कायद्यानुसार खाजगी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, पण रोज १२ तास काम करण्याची अट असणार आहे.

देशभरातील नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला एक मोठा बदल आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी नवीन कामगार कायदा लागू झाला होता. त्यानंतर आता खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आठवड्यातून सलग ३ दिवस सुट्टी मिळू शकणार आहे. म्हणजेच, कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त ४ दिवसच ऑफिसला जावे लागेल. मात्र, ही सुट्टी जितकी आकर्षक वाटते, तितक्याच यामागे काही महत्त्वाच्या अटीही आहेत. ही नवीन प्रणाली तुमच्या कामाचे स्वरूप बदलणार आहे.
३ दिवस सुट्टी, पण रोज १२ तास काम करावे लागणार
नवीन नियमांनुसार, सरकारने कंपन्यांना त्यांच्या कार्यसंस्कृतीत मोठा बदल करण्याची मुभा दिली आहे. सध्या बहुतांश ठिकाणी आठवड्यातून ५ किंवा ६ दिवस काम करावे लागते. नवीन नियमामुळे कामाचे दिवस ४ होऊ शकतात, परंतु एकूण कामाच्या तासांमध्ये (४८ तास) कोणतीही कपात होणार नाही. याचा अर्थ असा की, जर तुम्ही ४ दिवसांच्या कामाचा पर्याय निवडला, तर तुम्हाला रोज १२ तास काम करावे लागेल. या १२ तासांमध्ये विश्रांती आणि जेवणाच्या वेळेचाही समावेश असेल. यामुळे ज्यांना लाँग वीकेंड हवा आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरेल.
कोणताही बॉस किंवा कंपनी व्यवस्थापन हा नियम कर्मचाऱ्यांवर जबरदस्तीने लादू शकत नाही. हा नियम पूर्णपणे ऐच्छिक असेल. व्यवस्थापन आणि कर्मचारी या दोघांची सहमती असेल तरच तो लागू केला जाईल. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्य परिस्थिती नियम २०२६ नुसार, आता दैनंदिन पाळीऐवजी संपूर्ण आठवड्याच्या एकूण तासांवर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच ओव्हरटाईमचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. जर कंपनीने तुमच्याकडून आठवड्यातून ४८ तासांपेक्षा जास्त काम करून घेतले, तर त्यांना सामान्य पगाराच्या दुप्पट दराने ओव्हरटाईम द्यावा लागेल.
कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार थेट फायदा?
हे नवीन फोर-डे वर्क मॉडेल सर्वच उद्योगांना लागू पडणार नाही. याचा सर्वाधिक फायदा ज्ञान-आधारित आणि डिजिटल क्षेत्रातील व्यावसायिकांना होणार आहे.
- आयटी (IT) आणि आयटीईएस (ITeS)
- ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC)
- मार्केटिंग आणि डिझाइन
या क्षेत्रांमध्ये प्रकल्प-आधारित कामे जास्त असतात. ‘वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती आधीच रुजलेली असल्याने तिथे हा नियम लागू करणे सोपे जाणार आहे. आयटी क्षेत्रासाठी हा नियम फायदेशीर असला, तरी अनेक सेवाभावी आणि उत्पादन क्षेत्रांना याची अंमलबजावणी करणे कठीण जाणार आहे.
आरोग्यसेवा आणि रुग्णालये, हॉटेल्स आणि किरकोळ विक्री (Retail), वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि उत्पादन (Manufacturing) या क्षेत्रांमध्ये सेवांची मागणी २४ तास आणि सातही दिवस असते, त्यामुळे येथे ४ दिवसांचे वर्क मॉडेल राबवणे व्यवस्थापनासाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे.