
पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्यामध्ये सापाच्या बिळात पाणी शिरतं, त्यामुळे साप कोरडी आणि सुरक्षित जागा शोधण्यासाठी बिळातून बाहेर पडतात, बिळातून बाहेर पडलेले साप अनेकदा घरातच अंधाऱ्या ठिकाणी आश्रय घेतात. अशा परिस्थितीमध्ये सर्पदंशाचा धोका देखील वाढतो. विशेष: ग्रामीण भागामध्ये सर्पदंश होण्याच्या घटना अधिक घडतात, यातील काही साप हे विषारी असतात तर काही साप बिनविषारी असतात. ग्रामीण भागात आजही अनेक लोक हे अंधश्रद्धेचे बळी ठरतात. सर्पदंश झाल्यानंतर असे लोक रुग्णालयामध्ये न जाता एखाद्या भोंदू बाबाच्या नादी लागतात, त्याच्याकडूनही विष उतरवल्याचा दावा केला जातो. परिणामी वेळेत उपचार न मिळाल्यानं रुग्ण दगावल्याच्या अनेक घटना घडतात. रुग्णालयात जाण्यास उशिर झाल्यानं संपूर्ण विष शरीरात पसरत, त्यानंतर जरी रुग्ण रुग्णालयात दाखल झाला तरी देखील संपूर्ण विष शरीरात पसरल्यामुळे त्याच्या वाचण्याची शक्यता खूपच कमी असते.
म्हणूनच जर एखाद्या व्यक्तीला साप चावल्यानंतर पहिला एक तास हा अत्यंत महत्त्वाच असतो, याला गोल्डन हावर असं देखील म्हणतात. एखाद्या व्यक्तीला जर साप चावला तर सर्वप्रथम त्या व्यक्तीला धीर द्या आणी कुठल्याही तांत्रिक, मांत्रिकाच्या जाळ्यात न अडकता त्याला तातडीनं वैद्यकीय मदत कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करा, त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करा. साप चावल्याच्या पहिल्या तासभरात उपचार मिळाल्यास त्या रुग्णाचा जीव वाचू शकतो. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करा.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक साप हा विषारीच असतो असा आपला सर्वात मोठा गौरसमज आहे. परंतु भारतात सापांच्या फक्त चारच जाती या सर्वात जास्त विषारी आहेत, ज्यामध्ये नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार या चार जातींचा समावेश होतो, त्यांना आपण बिग फोर असं देखील म्हणतो. त्यामुळे अनेकदा आपल्याला चावलेला साप हा विषारी नसतो, मात्र साप हा विषारीच असतो या गैरसमजामुळे रुग्ण घाबरून जातो, घाबरल्यामुळे त्याच्या शरीरावर त्याचा जास्त परिणाम होतो. त्यामुळे साप कोणताही असो, विषारी किंवा बिनविषारी सर्पदंश झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला धीर द्या, आणि घाबरून न जाता, मांत्रिक, तांत्रिकाच्या नादी न लागता त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करा, लक्षात ठेवा ज्या व्यक्तीला साप चावला आहे, त्याच्यासाठी पहिला तास हा गोल्डन हवर असतो.