जवानांना सैन्यात अधिकारी होण्याचा मार्ग आणखी सोपा

या प्रक्रियेत जवानाला पाच महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाईल. सैन्यात युवा नेतृत्त्व पुढे यावं यासाठी संवाद, नेतृत्त्व आणि संघ बांधण्याची कला याबाबतचं प्रशिक्षण दिलं जाईल.

  • Sachin Patil
  • Published On - 18:15 PM, 7 Jun 2019
Indian aarmy fourth rank in world most powerful force

नवी दिल्ली : भारतीय सैन्यातील जवानांना आता अधिकारी (commissioned officers in the Indian Army) होण्याचा मार्ग आणखी सोपा झालाय. लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्याकडून या नव्या बदलाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रक्रियेत जवानाला पाच महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाईल. सैन्यात युवा नेतृत्त्व पुढे यावं यासाठी संवाद, नेतृत्त्व आणि संघ बांधण्याची कला याबाबतचं प्रशिक्षण दिलं जाईल.

चेन्नईतील Officers Training Academy (OTA) मध्येच एक स्वतंत्र संस्थेची स्थापना केली जाणार आहे. विशेष म्हणजे 200 सैनिकांच्या पहिल्या बॅचचं प्रशिक्षण यावर्षी 16 सप्टेंबरपासून सुरु होईल. पाच महिन्यांसाठी हे प्रशिक्षण असेल. या प्रकारचे दोन कोर्स सुरु करण्याचा भारतीय सैन्याचा विचार आहे, ज्यावर 10 अधिकाऱ्यांच्या कोअर टीमकडून लक्ष ठेवलं जाईल.

भारतीय सैन्याच्या अंतर्गत अहवालानुसार, जवानाने अधिकारी होण्याचं प्रमाण 41.4 टक्क्यांनी कमी आहे. SSB Centers च्या निवड प्रक्रियेत जवान अनेकदा बाद होतात आणि यशस्वी होण्याचं प्रमाण फक्त 8.46 टक्के आहे. त्यामुळेच Young Leaders Training Wing ही कल्पना समोर आली. यातून जवान SSB tests आणखी आत्मविश्वासाने देऊ शकतील, असं एका अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना सांगितलं.

Young Leaders Training Wing मध्ये प्रवेश मिळवलेला प्रत्येकच जवान अधिकारी होईल, असं नाही. पण अधिकारी होण्याचं प्रमाण नक्की वाढेल, असा आत्मविश्वास सैन्य अधिकाऱ्याने बोलून दाखवला. सध्याच्या नियमानुसार जवान तीन पद्धतीने अधिकारी होऊ शकतो. पहिलं म्हणजे Army Cadet College (ACC) द्वारे, दुसरा मार्ग Special Commissioned Officers (SCO entry) आणि तिसरा मार्ग म्हणजे Permanent Commission (Special List) (PCSL entry) हा आहे.

पहिल्या दोन प्रवर्गातील सैनिक कोणत्याही विभागात अधिकारी म्हणून नियुक्त होऊ शकतात. तर PCSL अधिकारी विशेष विभागात नियुक्त केले जातात. भारतीय सैन्यात सध्या 11 हजार अधिकाऱ्यांची कमतरता आहे. या नव्या निर्णयामुळे हा गॅप भरुन काढण्यास मदत होईल.

नव्या निर्णयानुसार, भारतीय सैन्याकडून ACC चे 500 उमेदवार निवडले जातील. एका स्पर्धा परीक्षेद्वारे या उमेदवारांची निवड होईल. स्पर्धा परीक्षा पंचमढीच्या Army Education Corps Centre कडून घेतली जाईल. विविध चाचण्यांनंतर या 500 पैकी 100 उमेदवारांची निवड होईल.