ओडिशात 24 वर्षानंतर पटनायक ‘राज’ संपुष्टात, भाजपचा दणदणीत विजय

देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना ओडिशा विधानसभा निवडणुकीचा निकाल ही जाहीर होत आहे. अजूनही निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. पण बऱ्याच ठिकाणी स्पष्ट संकेत मिळत आहेत. पाहा कोण किती जागेवर आघाडीवर आहेत.

ओडिशात 24 वर्षानंतर पटनायक राज संपुष्टात, भाजपचा दणदणीत विजय
| Updated on: Jun 04, 2024 | 10:24 PM

ओडिशात 24 वर्षांपासून सत्तेत असलेल्या नवीन पटनायक यांची सत्ता गेली आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 147 पैकी 78 जागांवर आघाडीवर आहे. तर बीजेडी 51 जागांवर आघाडीवर आहे. ओडिशात नवीन पटनायक 24 वर्षापासून (मार्च 2000) मुख्यमंत्री आहेत. ओडिशात भाजपने कोणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा न बनवता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती.

4 जून रोजी एकीकडे लोकसभेच्या 542 जागांसाठी मतमोजणी सुरू असताना दुसरीकडे ओडिशातील 147 विधानसभा निवडणुकांसाठीही मतमोजणी सुरू आहे. मतमोजणी संपेपर्यंत निकाल असाच राहिला तर प्रथमच बीजेडी नेते नवीन पटनायक यांना विरोधी पक्षात बसावे लागू शकते आणि राज्यात भाजप प्रथमच सरकार स्थापन करू शकते असे संकेत आहेत.

सुरुवातीला भाजप आणि नवीन पटनायक यांचा पक्ष बिजू जनता दल यांच्यात निकराची लढत दिसत होती. शनिवारी जाहीर झालेले एक्झिट पोलही असेच अंदाज देत होते. पण नंतर भाजपने निर्णयक आघाडी घेतली. एक्झिट पोलमध्ये नवीन पटनायक यांच्या बीजेडी 62 आणि भाजपला 80 जागा मिळण्याची अपेक्षा होती.

2019 च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत बीजेडीने राज्यातील 147 पैकी 117 जागा जिंकून सरकार स्थापन केले. त्यावेळी भाजपला 23 तर काँग्रेसला 9 जागा मिळाल्या होत्या. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 42 टक्के मते मिळू शकतात असा अंदाज होता. जी गेल्या वेळेच्या तुलनेत सुमारे 10 टक्क्यांनी वाढले आहे. 2019 मध्ये पक्षाला 32.49 टक्के मते मिळाली होती.