E20 पेट्रोलमधील ओलावा आणि क्लोराइडबाबतच्या दाव्यांना फेटाळले; OMC च्या तपासणीत इंधन सुरक्षित असल्याचे समोर

इथेनॉल मिश्रित (E20) पेट्रोलमध्ये ओलावा आणि क्लोराइडचे प्रमाण जास्त असल्याच्या अलीकडील दाव्यांनंतर त्याची तपासणी करण्यात आली, त्यात हे इंधन सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

E20 पेट्रोलमधील ओलावा आणि क्लोराइडबाबतच्या दाव्यांना फेटाळले; OMC च्या तपासणीत इंधन सुरक्षित असल्याचे समोर
E20 Petrol is Secure
Image Credit source: Google
| Updated on: Aug 07, 2026 | 11:55 PM

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2026 : इथेनॉल मिश्रित (E20) पेट्रोलमध्ये ओलावा आणि क्लोराइडचे प्रमाण जास्त असल्याच्या अलीकडील दाव्यांनंतर, ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) देशभरात संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये व्यापक तपासणी केली. या तपासणीत इंधनाची गुणवत्ता निर्धारित मानकांनुसार असल्याचे स्पष्ट झाले असून, 500 ppm क्लोराइड किंवा ओलावा असल्याचे दावे वैज्ञानिक चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले नाहीत, असे OMC ने स्पष्ट केले आहे.

OMCs ने ग्राहकांना आश्वस्त करत सांगितले की, इंधनाची गुणवत्ता ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असून वाहनांच्या कार्यक्षमतेवर किंवा ग्राहकांच्या विश्वासावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही बाबीची तातडीने वैज्ञानिक तपासणी करून आवश्यक उपाययोजना केल्या जातात.

क्लोराइडवर कडक नियंत्रण

भारत सरकारने पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाऱ्या इथेनॉलसाठी क्लोराइडचे कठोर मानक निश्चित केले आहेत. रिफायनरी, डिस्टिलरी, डेपो, टर्मिनल आणि पेट्रोल पंप अशा संपूर्ण पुरवठा साखळीत सातत्याने क्लोराइडची तपासणी केली जात असून सर्व स्तरांवर गुणवत्ता कायम राखली जात असल्याचे OMC ने म्हटले आहे.

पेट्रोल पंपांवर दिवसातून 8 ते 12 वेळा तपासणी

गुणवत्ता नियंत्रण अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पेट्रोल पंपांवर दिवसातून 8 ते 12 वेळा पाण्याची उपस्थिती आणि घनता चाचण्या घेतल्या जात आहेत. तसेच देशभरात मोबाईल इंधन तपासणी प्रयोगशाळा तैनात करण्यात आल्या असून स्वतंत्र इंधन प्रयोगशाळांकडूनही चाचणी अहवालांची पडताळणी केली जात आहे.

रिफायनरीतील पेट्रोलमध्ये क्लोराइड 1 ppm पेक्षा कमी

देशातील विविध रिफायनऱ्यांमधून यादृच्छिक पद्धतीने तपासण्यात आलेल्या 100 हून अधिक पेट्रोल नमुन्यांमध्ये क्लोराइडचे प्रमाण 1 ppm किंवा त्यापेक्षा कमी आढळले. यावरून भारतातील रिफायनिंग आणि वितरण प्रक्रियेतील गुणवत्ता नियंत्रण प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले.

80 डिस्टिलरींतील इथेनॉलही सुरक्षित

OMCs आणि सेंटर फॉर हाय टेक्नॉलॉजी (CHT) यांच्या संयुक्त पथकाने गेल्या दहा दिवसांत देशातील 80 डिस्टिलरींमधील इथेनॉल नमुन्यांची तपासणी केली. सर्व नमुन्यांमध्ये क्लोराइडचे प्रमाण 3 ppm पेक्षा कमी आढळले.

E20 पेट्रोलचेही समाधानकारक अहवाल

OMCs च्या डेपो, टर्मिनल आणि टँकरमधून घेतलेल्या 80 हून अधिक E20 पेट्रोल नमुन्यांमध्ये क्लोराइडचे प्रमाण 3 ppm पेक्षा कमी असल्याचे आढळले.

1,000 नमुन्यांपैकी बहुतांशमध्ये 0 ते 3 ppm क्लोराइड

देशभरातील पेट्रोल पंपांवरून 1,000 हून अधिक नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत प्राप्त झालेल्या 160 अहवालांमध्ये क्लोराइडचे प्रमाण 0 ते 3 ppm इतकेच असल्याचे समोर आले. त्यामुळे काही शेकडो ppm क्लोराइड असल्याचे दावे चुकीचे असल्याचे OMC ने स्पष्ट केले. मात्र, तपासणीदरम्यान केवळ चार वेगळ्या घटनांमध्ये क्लोराइडचे प्रमाण वाढलेले आढळले. त्या ठिकाणचा पुरवठा तातडीने बंद करून कारणांचा शोध घेत आवश्यक सुधारणा केल्यानंतरच पुन्हा पुरवठा सुरू करण्यात आला.

90 हजार पेट्रोल पंपांवरील भूमिगत टाक्यांची तपासणी

देशातील सुमारे 90 हजार पेट्रोल पंपांवरील भूमिगत इंधन साठवण टाक्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या टाक्यांची दिवसातून 8 ते 12 वेळा तपासणी केली जात असून आतापर्यंत कुठेही पाणी शिरल्याचे आढळलेले नाही, असे OMC ने सांगितले.

ग्राहकांनी E20 पेट्रोल निर्धास्तपणे वापरावे

OMCs ने स्पष्ट केले की, त्यांच्या नेटवर्कद्वारे पुरवले जाणारे E20 पेट्रोल सर्व निर्धारित गुणवत्ता निकषांची पूर्तता करते. संपूर्ण पुरवठा साखळीवर सातत्याने देखरेख ठेवली जात असून कुठेही त्रुटी आढळल्यास तातडीने दुरुस्ती केली जाते. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही शंका न बाळगता E20 पेट्रोलचा वापर सुरू ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us