Satej Patil: गोकुळच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीसांचा सल्ला; सतेज पाटलांचं ट्विटमधून प्रत्युत्तर, दिलं थेट आव्हान
Satej Patil On Gokul News: गोकुळच्या अध्यक्षपदावरून सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. तसेच गोकुळ अध्यक्षपदाचा पेच सोडवण्याची मागणी केली आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दोन्ही गटांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी ट्विटद्वारे त्यांना उत्तर दिले आहे. अध्यक्ष निवडीसाठी कोरमचा प्रश्न निर्माण होत असेल, तर शासननियुक्त संचालकांची संख्या वाढवण्याऐवजी संस्थेचे पोटनियम का बदलले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी १० तारखेला होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे. लोकशाही टिकावी, असे वाटत असेल तर या सभेला आपल्या बारा संचालकांना उपस्थित ठेवा आणि गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील-चूयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग सुकर करा, असे त्यांनी म्हटले आहे.
सतेज पाटील यांनी आपल्या ट्विटमधून खासदार धनंजय महाडिक यांच्यावरही निशाणा साधला. ज्यांना स्वतःच्या घरातील जागा निवडून आणता आली नाही आणि जनतेने ज्यांना दोन लाख मतांनी नाकारले, असे आपलेच खासदार विसंगत भूमिका मांडत असल्याचा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत भूमिका स्पष्ट केली होती.
गोकुळची निवडणूक झाल्यानंतर दोन्ही गटांपैकी कोणाकडेही बहुमत नसल्याने अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक कोरम पूर्ण होत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. कोरमशिवाय निवडणूक घेऊ नये, असे न्यायालयाने निर्देश दिले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते. तीन वेळा निवडणूक होऊनही अध्यक्ष निवडला गेला नाही, तर पुन्हा निवडणूक घेण्याची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही गटांकडे कोरम पूर्ण करण्याइतके संख्याबळ नसल्याने हा विषय सरकारकडे आल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र, राज्य सरकारला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज नसून दोन्ही गटांनी आपापसांत निर्णय घेतल्यास तो सरकारकडे पाठवण्याचीही आवश्यकता नसल्याचे फडणवीस म्हणाले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानंतर सतेज पाटील यांनी थेट ट्विटमधून भूमिका मांडली आहे. त्यामुळे १० तारखेच्या सभेत गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटणार का, याकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
