दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी 3 शुभ मुहूर्त, जाणून घ्या पूजा करण्याची योग्य वेळ आणि विधी
यंदा 8 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे. या दिवशी लक्ष्मी आणि गणेश पूजनाला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाचे शुभ मुहूर्त, पूजा करण्याची विधी येथे जाणून घ्या.

दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी घराघरांत दिव्यांची रोषणाई, रांगोळी आणि सजावट केली जाते. दिवाळीच्या संध्याकाळी धन आणि समृद्धीची देवता मानल्या जाणाऱ्या देवी लक्ष्मी आणि विघ्नहर्ता भगवान गणेश यांची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या रात्री विधीपूर्वक लक्ष्मीपूजन केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. यंदा उद्या म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी होणार असून लक्ष्मीपूजनासाठी तीन शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. अशावेळी पूजेची योग्य वेळ, पूजेची पद्धत आधीच जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, 2026 मध्ये दिवाळी 8 नोव्हेंबर, रविवार रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी लक्ष्मी आणि गणेश पूजनासाठी पुढील शुभ वेळा आहेत.
• मुख्य लक्ष्मी पूजन मुहूर्त: संध्याकाळी 5 वाजून 54 मिनिटे ते रात्री 7 वाजून 50 मिनिटे. • पूजेचा कालावधी: 1 तास 56 मिनिटे. • प्रदोष काळ: संध्याकाळी 5 वाजून 31 मिनिटे ते रात्री 8 वाजून 9 मिनिटे. • वृषभ काळ (स्थिर लग्न): संध्याकाळी 5 वाजून 54 मिनिटे ते रात्री 7 वाजून 50 मिनिटे. • निशिता काळ: रात्री 11 वाजून 49 मिनिटे ते मध्यरात्री 12 वाजून 41 मिनिटे (9 नोव्हेंबर).
दिवाळीला लक्ष्मी पूजन कसे करावे?
– सर्वप्रथम घरातील पूजा स्थळ स्वच्छ करून घ्या. त्यानंतर गंगाजल शिंपडून जागेचे शुद्धीकरण करा. उजव्या हातात थोडे पाणी घेऊन आचमन करा. – हातात थोडे पाणी, अक्षता आणि फुले घेऊन आपले नाव, ठिकाण सांगून पूजेचा संकल्प करा. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि आनंदासाठी पूजा करत असल्याचे मनोमन सांगा. – पूजेच्या चौरंगावर लाल किंवा पिवळे कापड टाका. त्यावर तांदळाची रास करून पाण्याने भरलेला कलश ठेवा. कलशात सुपारी, नाणे आणि अक्षता टाकून त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवा. – चौरंगावर भगवान गणेश, देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू किंवा कुबेर यांची मूर्ती स्थापित करावी. आपल्या घरातील परंपरेनुसार देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवा. – सर्वप्रथम भगवान गणेशाला हळदी, कुंकू, अक्षता, दुर्वा आणि फुले अर्पण करा. मग देवी लक्ष्मीचे आवाहन करून त्यांना जल, पंचामृत, लाल वस्त्र, कुंकू, अक्षता, अत्तर आणि फुले अर्पण करा. देवीला कमळ किंवा गुलाबाची फुले आणि मिठाईचा नैवेद्य दाखवा. – देवी लक्ष्मीसमोर व्यवसायाची वही, हिशोबाची पुस्तके, लॅपटॉप किंवा उत्पन्न मिळवण्याची साधने ठेवून त्यांचीही पूजा करा. याशिवाय आपल्या कुटूंबाच्या परंपरेनुसार धान्य, दागिणे, झाडू अशा सर्व वस्तू ठेवून त्यांची सुद्धा पूजा करा. – देवी लक्ष्मीसमोर तुपाचा मोठा दिवा आणि अखंड दिवा लावा. हा दिवा रात्रभर तेवत राहील याची काळजी घ्या. – पूजेच्या शेवटी धूप आणि दीप दाखवून श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करा. त्यानंतर देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची आरती करा. फुले अर्पण करून पूजेदरम्यान नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमा मागा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
