Diwali Lakshmi Pooja : दिवाळीत अभ्यंगस्नान आणि लक्ष्मीपूजनाचा ‘हा’शुभ मुहूर्त चुकवू नका, जाणून घ्या वेळ आणि पूजा विधी कशी करायची?
यंदा ८ नोव्हेंबर २०२६ रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे. अभ्यंगस्नान आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त तसेच पूजेची सोपी पद्धत जाणून घ्या.

यंदा 8 नोव्हेंबर 2026 रोजी नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे. त्यामुळे दिवाळीच्या पहाटे अभ्यंगस्नान, तर संध्याकाळी लक्ष्मीपूजन असे दोन्ही महत्त्वाचे पूजा करावी लागणार आहे. महाराष्ट्रसाठी मुंबईचा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त संध्याकाळी 6 वाजून 27 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे.
अभ्यंगस्नानाचा मुहूर्त किती वाजता आहे?
यंदा नरक चतुदर्शीचे अभ्यंगस्नान रविवार 8 नोव्हेंबर रोजी ृपहाटे करायचे आहे. महाराष्ट्रसाठी दिलेल्या वेळेनुसार अभ्यंगस्नानाचा मुहूर्त पहाटे 5 वाजून 45 मिनिटांपासून सकाळी 6 वाजून 42 मिनिटांपर्यंत आहे. सूर्योदयाची वेळही सकाळी 6 वाजून 42 मिनिटे अशी आहे.
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त केव्हा आहे?
दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोषकाळात लक्ष्मीपूजन करण्याला महत्त्व आहे. मुंबईसाठी 8 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त संध्याकाळी 6 वाजून 27 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे. हा वृषभ स्थिर लग्नाचा मूहुर्त असून त्याचा कालावधी दोन तासांचा आहे.
तारीख : रविवार 8 नोव्हेंबर 2026 लक्ष्मीपूजन : संध्याकाळी 6.27 ते रात्री 8.27 प्रदोषकाल : संध्याकाळी 6.02 ते रात्री 8.34 अमावस्या तिथी सुरू : सकाळी 11.27
हा मुहूर्त मुंबईसाठी आहे. पुणे,नागपूर, नाशिक आणि इतर शहरांमध्ये स्थानिक सूर्योदय- सूर्यास्तानुसार वेळेत काही मिनिटांचा फरक असू शकतो. त्यामुळे शहराचे पंचांग तपासणे योग्य ठरेल.
लक्ष्मीपूजन कसं करावं? जाणून घ्या सोपी पद्धत
दिवाळीत सायंकाळची किंवा रात्रीची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते. बहुतेक लोक दिवाळीत याच वेळी पूजा करतात. म्हणून, संध्याकाळी स्नान आणि इतर विधींनंतर, पूजेची जागा स्वच्छ करा आणि संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा. आता, एक लाकडी ओटा तयार करा आणि त्यावर एक स्वच्छ लाल कापड पसरा.
मूठभर तांदूळ किंवा धान्यावर कलश स्थापित करा. कलशामध्ये पवित्र पाणी, फुले, सुपारी, अखंड तांदळाचे दाणे, वेलची आणि एक चांदीचे नाणे ठेवा. कलशाचे तोंड आंब्याच्या पाच पानांनी झाका.
यानंतर, देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांच्या नवीन मूर्तींची स्थापना करा. देवतांना जलाभिषेक करा, नंतर त्यांना गंगाजल आणि पंचामृताने स्नान घाला. त्यानंतर, पवित्र पाण्याने पुन्हा जलाभिषेक करा. मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि त्यांना एका आसनावर ठेवा.
आता गणपतीला पिवळ्या चंदनाचा टिळा आणि लक्ष्मीला लाल चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावा. कलशालाही टिळा लावा. देवाला फळे, विड्याची पाने, फुले, मिठाई, वेलची, अख्खे धान्य आणि सुपारी अर्पण करा. गणपतीला पिवळ्या फुलांचा हार आणि लक्ष्मीला कमळाच्या बीजांचा हार घाला.
आता अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावा. गणपतीला लाडू आणि लक्ष्मीला खीर अर्पण करा. पूर्ण भक्तीभावाने, प्रथम गणपतीची आरती करा, त्यानंतर लक्ष्मी आणि कुबेराची आरती गा. शेवटी, क्षमा मागा.
