आधी ढाक्यातील भिंतीला लक्ष्य, आता खुलनामध्ये टागोरांच्या प्रतिमेची विटंबना; बांगलादेशात नव्या वादाला तोंड फुटलं
Bangladesh Rabindranath Tagore Portrait Is Defaced: बांगलादेशात रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्राची विटंबना करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

बांगलादेशातील खुलना येथे नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्राची काळ्या शाईने नासधूस करण्यात आली आहे. देशाच्या सांस्कृतिक वारशातील त्यांचे योगदान नाकारणारे पोस्टर्स त्या चित्राशेजारी लावण्यात आले. त्या पोस्टर्सवर स्पष्टपणे लिहिले होते की, मुस्लिमांचे प्रतीक आणि पूर्व बंगालचे शत्रू असलेल्या टागोर यांना बांगलादेशात स्थान नाही. या घटनेवर स्थानिक प्रशासन आणि सांस्कृतिक कार्यकर्त्यांकडून टीका झाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
बांगलादेशची राजधानी ढाका येथे ऑक्टोबरमध्ये टागोर यांच्या भित्तिचित्राला लक्ष्य करण्यात आल्याच्या काही आठवड्यांनंतरच खुलनामध्ये ही घटना घडली आहे. खुलना रेल्वे स्टेशनच्या सीमाभिंतीवर बनवलेले हे भित्तिचित्र, त्या भागातील कला, साहित्य आणि सांस्कृतिक इतिहासातील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींच्या चित्रांपैकी एक होते. मात्र त्याच भिंतीवरील इतर व्यक्तिमत्त्वांची चित्रे जशीच्या तशी ठेवण्यात आली.
यामध्ये लोकगायक फकीर लालन शाह, चित्रकार एस. एम. सुलतान, कवी काझी नझरुल इस्लाम, माजी पंतप्रधान खालेदा झिया, माजी राष्ट्रपती झियाउर रहमान आणि लेखक मायकल मधुसूदन दत्ता यांचा समावेश आहे. या भिंतीवर जुलै उठाव, सुंदरबन, साठ घुमटांची मशीद आणि बांगलादेशचा ताग उद्योग दर्शवणारी चित्रेही आहेत. पंतप्रधान तारिक रहमान यांच्या शहर दौऱ्यापूर्वी खुलना शहर महापालिकेने (केसीसी) ही कलाकृती तयार करून घेतली होती.
भिंतीवरील चित्राजवळ दोन पोस्टर्सही लावण्यात आले होते. त्यापैकी एकावर टागोर आणि त्यांच्या भारताशी असलेल्या संबंधांवर थेट निशाणा साधणारा संदेश होता . त्या पोस्टरवर लिहिले होते, मुस्लिम आणि पूर्व बंगालचा शत्रू असलेल्या टागोर यांना टिटुमीरच्या बंगालमध्ये स्थान नाही. भारताची स्तुती करायला येथे जागा नाही. त्या संदेशात बांगलादेशात टागोर यांचा सन्मान करण्यावर आक्षेप घेण्यात आला होता, त्यांना मुस्लिमांचे आणि पूर्व बंगालचे शत्रू संबोधण्यात आले होते. तसेच भारताच्या स्तुतीलाही विरोध करण्यात आला होता.
खुलना सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी लोकमान होसेन यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी चित्राची विटंबना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी तपास सुरू केला. शुक्रवारी रस्त्याच्या पलीकडील सर्व दुकाने बंद होती, त्यामुळे चित्राची तोडफोड कोणी आणि केव्हा केली हे निश्चित करणे कठीण झाले, असे होसेन यांनी ढाका ट्रिब्यूनला सांगितले. केसीसी प्रशासक नझरुल इस्लाम मंजू यांनी या कृत्याचा निषेध केला आहे.
ते म्हणाले की, हे फोटो मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये मुक्त विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने काढण्यात आले होते. वृत्तपत्राने त्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, फोटो विद्रूप करून त्यांनी आपली संकुचित वृत्ती आणि विकृत विचार दाखवले आहेत. नाट्य लोकचे सांस्कृतिक कार्यकर्ते आणि महासचिव शरीफुल इस्लाम सलीम यांनी या घटनेमागे एका संघटित गटाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, ढाकामध्येही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. इतर प्रमुख व्यक्तींनाही लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
त्यांनी ढाकामध्येही अशाच प्रकारची कृत्ये केली आहेत. या घटना हेतुपुरस्सर घडवून आणल्या आहेत. जबाबदार असलेल्यांना ओळखून शिक्षा झालीच पाहिजे. हे फक्त रवींद्रनाथांपुरतेच थांबता कामा नये; ते इतर प्रमुख व्यक्तींनाही लक्ष्य करू शकतात,” असे ‘द डेली स्टार’ने त्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. सलीम पुढे म्हणाले की, टागोर यांच्या लेखनाने आणि विचारांनी अनेक पिढ्यांना मुक्त विचार, धर्मनिरपेक्षता आणि मानवी प्रतिष्ठा स्वीकारण्याची प्रेरणा दिली आहे. ऑक्टोबरमध्ये बांगलादेशची राजधानी ढाका येथे टागोर यांच्या भित्तिचित्राला लक्ष्य करण्यात आल्याच्या काही आठवड्यांनंतरच खुलना येथे ही घटना घडली आहे.
पोलिसांनी त्या घटनेप्रकरणी स्टेट डायलॉग फोरमचे सदस्य सचिव अल नूर मोहम्मद अयाश यांच्यासह चार जणांना ताब्यात घेतले आहे. बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा एका हिंदू महिलेवर निर्घृणपणे हल्ला करून तिचा छळ करण्यात आला आहे. देशाची राजधानी ढाका शहराच्या मध्यभागी राहणाऱ्या रीटा राणी नावाच्या महिलेला क्रूर आणि अमानुष छळाला सामोरे जावे लागले आहे. आरोपानुसार, सत्ताधारी बीएनपी-समर्थित ‘सेवक दल’च्या मीरपूर भागाच्या संयोजक महा फिरोज यांच्या नेतृत्वाखालील लोकांच्या एका गटाने तिच्या घरात घुसून तिचा छळ केला.
