
देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आला आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण कोरोनाच्या संशयीत रुग्णांची संख्या 1009 वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर सात जाणांचा मृत्यू देखील झाला आहे, मात्र ज्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाला की अन्य कशामुळे हे अद्याप समोर आलेलं नाहीये. या रुग्णाच्या मृत्यूचं कारण तपासलं जात आहे.
भारतामध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णांचा आकडा हा 1,000 वर पोहोचला आहे. यातील 752 प्रकरणाची पुष्टी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण केरळमध्ये आहेत. केरळमधील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 430 वर पोहोचला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा नंबर आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 209 इतकी आहे, दिल्लीमध्ये 104 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. तर कर्नाटकात 47 आणि पश्चिम बंगालमध्ये 11 कोरोनाचे सक्रिया रुग्ण आहेत.
सात जणांचा मृत्यू
आतापर्यंत सात संशयित कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार, केरळमधील दोन तर कर्नाटकमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. मात्र या रुग्णांचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाला की अन्य काही कारणांमुळे याची पुष्टि अद्याप आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली नाहीये, त्यांच्या मृत्यूचं कारण तपासलं जातं आहे. अशीही माहिती समोर येत आहे की, या रुग्णांना इतर काही आजार देखील होते.
या राज्यांमध्ये एकही रुग्ण नाही
एकीकडे देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे मात्र असे देखील काही राज्य आहेत, ज्यामध्ये कोरोनाचा अद्याप एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाहीये. यामध्ये अंदमान आणि निकोबार, अरूणाचल प्रदेश, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या राज्याचा समावेश आहे.
आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येनं वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असून, प्रत्येक राज्याच्या आरोग्य विभागाला या पार्श्वभूमीवर तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णालयांना देखील आदेश देण्यात आले आहेत, जर एखादा संशयित रुग्ण आढळून आल्यास त्याची कोरोना चाचणी करा.