RBI वाढवणार EMI? कांद्याचे भाव दुप्पट अन् एल निनोचे संकट! डिसेंबरमध्ये काय काय घडणार?
रिझर्व्ह बँकेची 'मॉनेटरी पॉलिसी कमिटी' डिसेंबरमध्ये बैठक घेणार आहे. त्याआधी किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर होईल. डिसेंबरमध्ये नेमकं काय काय घडणार याचा अंदाज जाणून घ्या.

महागाईमुळे आधीच सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. सणासुदीच्या काळातही महागाई होतीच. आता पुढील महिन्यात सर्वसामान्यांवरील आर्थिक भार पुन्हा एकदा वाढू शकतो. कारण कांद्याचे भाव जवळपास १०० टक्क्यांनी वाढले आहेत, तर कडधान्ये, तांदूळ आणि दुधाच्या किमतीही वर सरकल्या आहेत. त्यातच ‘एल निनो’चे संकट परिस्थिती अधिकच गंभीर करत आहे. अनेक ठिकाणी ओला दुष्काळ आहे तर अनेक ठिकाणी कोरडा दुष्काळ आहे. यातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्याजदरांबाबत काही कठोर निर्णय घेईल का? आणि याचा परिणाम परिणाम गृहकर्ज व इतर कर्जांच्या हप्त्यांवर (EMI) होईल का? असा प्रश्नही समोर आहेच. या सगळ्यातून असच दिसून येतं की पुढच्या महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये महागाई आणखीन वाढेल का?
किरकोळ महागाईची आकडेवारी कधी जाहीर होणार?
ऑक्टोबर महिन्यासाठी किरकोळ महागाईची आकडेवारी १२ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर वार्षिक आधारावर ५.५४% इतका होता. बँक ऑफ बडोदाच्या अर्थतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ऑक्टोबरमध्ये हा दर ६% पर्यंत वाढू शकतो. जर असे घडले, तर महागाईबाबतची चिंता अधिक गडद होऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) ‘मॉनेटरी पॉलिसी कमिटी’ची (MPC) डिसेंबरमध्ये होणारी बैठक पाहता, ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची ठरेल.
नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच किती वाढ?
बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार, ऑक्टोबर महिन्यात २० अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत वार्षिक आधारावर ११.१ टक्क्यांची वाढ झाली आहे. यापैकी १५ वस्तूंसाठी महागाई दरात वाढ दिसून आली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठ दिवसांतही या वस्तूंच्या किमतीत वार्षिक आधारावर ११.२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
कांद्याचे भाव दुप्पट?
कांद्याचे भाव दुप्पट झाले आहेत. कांद्याच्या किमतीत सर्वाधिक वाढ दिसून आली. ऑक्टोबर महिन्यात या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत ९९.६ टक्क्यांनी अधिक होत्या. मात्र, याचे एक कारण असेही आहे की, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या किमतीत ५१.२ टक्क्यांची घट झाली होती. याव्यतिरिक्त, तांदूळ, तूर डाळ, उडीद डाळ, दूध, गूळ आणि खाद्यतेलांच्या किमतीतही वाढ झाली आहे. टोमॅटोच्या किमतीत वार्षिक आधारावर ६ टक्क्यांनी वाढ झाली. दुसरीकडे, ऑक्टोबर महिन्यात साखरेचे भाव मागील महिन्याच्या तुलनेत ४.५ टक्क्यांनी कमी होते.