1 अब्ज संपत्ती, राजघराण्यातील श्रीमंत आमदाराने गाठले पोलीस स्टेशन, कोणासोबत झाला वाद?

बिकानेर राजघराण्याच्या सदस्या भाजप आमदार सिद्धी कुमारी यांच्या मालमत्तेवरून वाद वाढतच चालला आहे. सिद्धी कुमारी यांनी त्यांच्या आत्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली.

1 अब्ज संपत्ती, राजघराण्यातील श्रीमंत आमदाराने गाठले पोलीस स्टेशन, कोणासोबत झाला वाद?
BJP MLA SIDDHI KUMARI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jan 04, 2024 | 11:05 PM

जयपूर | 04 जानेवारी 2024 : राजस्थानच्या बिकानेर पूर्व विधानसभेच्या भाजप आमदार सिद्धी कुमारी यांनी नामांकनादरम्यान दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती 1.11 अब्ज रुपये असल्याचे सांगितले. 2018 मध्ये सिद्धी कुमारी यांची संपत्ती 8.89 कोटी रुपये होती. याशिवाय स्थावर मालमत्तेत हिमाचल प्रदेशातील चंबा येथील सुमारे 150 बिघा जंगलाचा समावेश आहे. बिकानेरच्या गजनेर ग्रामपंचायतीत त्यांची 247 बिघे जमीन आहे. याशिवाय देशातील अनेक प्रसिद्ध ठिकाणांवरील मौल्यवान वनस्पती त्यांच्या नावावर आहेत. जुनागढमध्ये असलेल्या प्राचीन संग्रहालयातही सिद्धी कुमारी यांचा हिस्सा आहे. मात्र, याच सिद्धी कुमारी यांनी मालमत्तेच्या वादावरून पोलीस स्टेशन गाठले.

बिकानेर राजघराण्याच्या सदस्या भाजप आमदार सिद्धी कुमारी यांच्या मालमत्तेवरून वाद वाढतच चालला आहे. सिद्धी कुमारी यांनी त्यांच्या आत्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली. सिद्धी कुमारी यांनी आत्यावर फसवणूक, खोटी कागदपत्रे तयार करणे, खोटे पुरावे आणि आणि चुकीची वस्तुस्थिती मांडल्याबद्दल आरोप केला आहे. न्यायलयाने सिद्धी कुमारी यांच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

आमदार सिद्धी कुमारी यांच्या आत्या आणि माजी महाराजा करणी सिंह यांची कन्या राज्यश्री यांच्यामध्ये मालमत्तेवरून सुरु असलेला वाद पुन्हा उफाळून आलाय. या प्रकरणी त्यांनी येथील प्रथम न्यायालयात तक्रार केली. न्यायालयाने ते मान्य करत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बिकानेरच्या सदर पोलीस ठाण्यात आत्या राज्यश्री कुमारी, मयूर ध्वज गोहिल यांच्यासह स्वीय सहाय्यक राजेश पुरोहित, गौरव बिनानी, पुखराज आणि रितू चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

न्यायालयाच्या आदेशानुसार सदर पोलीस ठाण्यात आमदार सिद्धी कुमारी यांच्या अहवालाची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४६७, ४६८, ४२०, ५००, ५०१ आणि १२० बी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सदर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेंद्र सिंग यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

आत्यानेही केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

दरम्यान, सिद्धी कुमारी यांची आत्या राज्यश्री यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी सिद्धी कुमारी यांनी उमेदवारी अर्ज भरताना चुकीची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या संपत्तीचा दिलेला तपशील चुकीचा आहे असे म्हटले आहे.