
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सध्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा NIA कडून चौकशी सुरु आहे. त्यातच आता काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्याच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. पुण्यातील रहिवासी श्रीजीत रमेशन यांनी आपल्या कुटुंबासोबत काश्मीरमध्ये फिरताना चित्रीत केलेल्या एका व्हिडीओत संशयित अतिरेकी कैद झाले. हा व्हिडीओ हल्ल्याच्या तीन दिवस आधी चित्रीत करण्यात आला आहे. हा व्हिडिओ NIA च्या तपासासाठी महत्त्वाचा धागा ठरत आहे.
पुण्यातील श्रीजीत रमेशन हे आपल्या कुटुंबासह १८ जून रोजी काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. त्याच दिवशी, बेताब व्हॅलीमध्ये फिरताना त्यांनी आपल्या मुलीचा एक रील बनवला. हा रील बनवता दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या कॅमेऱ्यात मागून झपाट्याने जाताना दिसले. त्यावेळी त्यांच्या हालचालींमुळे रमेशन यांचं लक्ष त्या दोघांवर गेलं. काश्मीरमधून परतल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा सुरक्षा यंत्रणांनी संशयित अतिरेक्यांचे स्केच जाहीर केले. तेव्हा रमेशन यांना त्या चेहऱ्यांपैकी काही ओळखीचे वाटले. त्यांनी तात्काळ त्यांचे काश्मीरमधील फोटो आणि व्हिडीओ पुन्हा तपासले. त्यावेळी त्यांच्या मुलीच्या अर्धवट रीलमध्ये ते दोन व्यक्ती तिथे स्पष्टपणे दिसून आले.
ही बाब त्यांनी थेट दिल्ली येथील राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कडे कळवली. यानंतर एनआयएने त्यांना चौकशीसाठी बोलावले. त्यांच्या मोबाईलमधील फुटेजची तपासणी केली. त्यानंतर त्यांनी काही व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे एनआयएकडून तपास सुरू केला, अशी माहिती श्रीजीत रमेशन यांनी दिली.
दरम्यान मंगळवारी 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये हा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचा सध्या कसून तपास सुरु आहे. या हल्ल्यात ४ दहशतवादी सहभागी होते. या चौघांनी मिळून पहलगामच्या पर्यटकांना लक्ष्य केले. त्यांच्याजवळ एके-47 आणि एम4 सारख्या अत्याधुनिक रायफल्स होत्या. तसेच घटनास्थळावरून या रायफल्सची काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. ही काडतुसे तपासाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. हे सर्व दहशतवादी घनदाट जंगलातून २२ तास पायी चालत बैसरनच्या मैदानी भागात पोहोचले होते, असा दावा केला जात आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांपैकी ३ नागरिक पाकिस्तानातील होते. तर एक दहशतवादी आदिल ठोकर हा स्थानिक होता.