
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची अत्यंत क्रूरतेने हत्या करण्यात आली. मृतांमध्ये सर्व पुरुष आहेत. काश्मीर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या पत्नीसमोर त्यांचं कुंकू पुसण्याचा क्रूर प्रकार या दहशतवाद्यांनी केला. आता त्यापेक्षा पण एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवळपास 20 मृतांच्या पॅन्ट्स कमरेच्या खाली खेचलेल्या होत्या. त्या पॅन्ट्सची चैन खुली होती. सर्वप्रथम घटनास्थळी जाऊन हे 26 निष्प्राण देह पाहणाऱ्या टीमच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. पर्यटकांची हत्या करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म तपासल्याच यातून दिसून येतय. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि जम्मू-काश्मीर प्रशासनतील अधिकारी या तपास टीममध्ये होते. त्यांना पाहिलं की, 26 पैकी 20 मृतदेहाच्या शरीरावरील पॅन्ट्स कमेरच्या खाली होत्या. जबरदस्तीने त्या पॅन्ट्स खाली खेचलेल्या होत्या. पॅन्ट्सच्या चैनी उघड्या होत्या. अंडरवेअर आणि प्रायव्हेट पार्ट दिसत होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या मृतांच्या नातेवाईकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर निश्चितच त्यांना मोठा धक्का बसला असेल. घटनास्थळी गेलेल्या तपास टीमने वस्त्र मागवून हे मृतदेह झाकले.
या दहशतवाद्यांनी तीन चाचण्या केल्या
दहशतवाद्यांनी प्रत्येक पीडिताचा धर्म तपासला. त्यांच्याकडे आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सारखे पुरावे मागितले. त्यांना कलमा वाचायला सांगितला. त्यांची कमरेखालची वस्त्र काढायला लावली. प्रत्यक्षदर्शींनी हा भयानक अनुभव सांगितला. तीन चाचण्यांमधून ते हिंदू असल्याच निष्पन्न झाल्यानंतर या दहशतवाद्यांनी जवळून गोळी झाडून त्या पर्यटकांची हत्या केली. मंगळवारच्या पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले 26 पैकी 25 हिंदू होते. सर्व पुरुषांची या दहशतवाद्यांनी हत्या केली.
किती जणांना ताब्यात घेतलय?
या भयानक हत्याकांडानंतर हे हल्लेखोर आणि त्यांच्यामागच्या मास्टरमाइंडचा शोध सुरु झाला आहे. त्राल, पुलवामा, अनंतनाग आणि कुलगाममधून दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती असलेल्या जवळपास 70 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीर पोलीस, इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ च्या अधिकाऱ्यांकडून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. सुरुवातीला जवळपास 1500 जणांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलं होतं. त्यातून पहलगामच्या हल्लेखोरांना कुठल्या ना कुठल्या स्वरुपाची मदत केल्याचा 70 जणांवर दाट संशय आहे.