India-Pakistan : बॉर्डरवर संघर्ष सुरु, LOC वर रात्रभर गोळीबार, पाकिस्तानला भारताच खणखणीत प्रत्युत्तर

India-Pakistan : भारताकडून कधीही Action होईल ही भिती पाकिस्तानला सतावत आहे. या दरम्यान त्यांनी स्वभावाप्रमाणे बॉर्डर आणि नियंत्रण रेषेवर कुरापती सुरु केल्या आहेत. भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानच्या या नापाक हरकतीला जशास तस प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरच्या आकाशात फायटर जेट्स उड्डाण करताना दिसत आहेत.

India-Pakistan : बॉर्डरवर संघर्ष सुरु, LOC वर रात्रभर गोळीबार, पाकिस्तानला भारताच खणखणीत प्रत्युत्तर
Indian Army
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 25, 2025 | 8:25 AM

पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संताप आहे. या दरम्यान भारताच्या कारवाईच्या भितीने भेदरलेल्या पाकिस्तानकडून सीमेवर जोरदार हालचाली सुरु आहेत. LOC वर पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार सुरु होता. पाकिस्तानच्या या नापाक हरकतीला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. नियंत्रण रेषेवर असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांकडून हा गोळीबार सुरु आहे. या गोळीबारात भारताच्या बाजूला काहीही नुकसान झालेलं नाही. पाकिस्तानी सैन्याने फेब्रुवारी महिन्यात पूँछ जिल्ह्यात LOC वर असलेल्या भारतीय चौक्यांवर हल्ला केला होता. भारताने या कारवाईला प्रत्युत्तर दिलं होतं. तीन दिवसांपूर्वी 22 एप्रिलच्या दुपारी जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाम येथे भारतीय पर्यटकांची निदर्यतेने हत्या करण्यात आली.

देशभरातून काश्मीर भ्रमंती करण्यासाठी आलेल्या पर्यटकांची धर्म विचारुन हत्या करण्यात आली. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. 17 जण जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची भावना आहे. पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवा, त्यांच्याविरुद्ध कारवाई करा, अशी देशभरातून मागणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पेहेलगामच्या हल्लेखोरांना आणि त्यांच्या मास्टरमाइंड्सना कल्पनेपलीकडची शिक्षा दिली जाईल हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे टेन्शनमध्ये आलेला पाकिस्तान हाय-अलर्टवर आहे.

राहुल गांधी आज काश्मीरमध्ये

पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय-अलर्टवर आहेत. उत्तर काश्मीर आणि पीर पंजालच्या क्षेत्रात फायटर विमानांची उड्डाण सुरु आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमींची ते विचारपूस करतील. राहुल गांधी अनंतनाग येथील सरकारी मेडिकल कॉलेजचा (जीएमसी) दौरा करतील.

बांदीपोरामध्ये एन्काऊंटर सुरु

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु आहे. दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा पथकांनी जिल्ह्याच्या कुलनार बाजीपुरा भागात घेराबंदी करुन शोध मोहिम सुरु केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरु असताना अतिरेक्यांनी गोळीबार सुरु केला. त्यावेळी हे शोध अभियान चकमकीत बदललं.