Congress vs Bjp | पाकिस्तान भाजपासाठी शत्रू देश, आमच्यासाठी नाही, काँग्रेस नेत्याच वक्तव्य

| Updated on: Feb 29, 2024 | 12:10 PM

Congress vs Bjp | भाजपासाठी पाकिस्तान शत्रू देश असू शकतो, पण काँग्रेससाठी पाकिस्तान एक शेजारी देश आहे असं एका काँग्रेस आमदाराने वक्तव्य केलं. सयद नासेर हुसैन यांनी राज्यसभेची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्याचा आरोप आहे.

Congress vs Bjp | पाकिस्तान भाजपासाठी शत्रू देश, आमच्यासाठी नाही, काँग्रेस नेत्याच वक्तव्य
Congress Party
Follow us on

Congress vs Bjp | एका काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावरुन बुधवारी मोठा वाद झाला. पाकिस्तान संदर्भात या नेत्याने वक्तव्य केलं. भाजपासाठी पाकिस्तान शत्रू देश असू शकतो, पण काँग्रेससाठी पाकिस्तान एक शेजारी देश आहे असं कर्नाटकातील काँग्रेस आमदार बी.के.हरीप्रसाद यांनी वक्तव्य केलं. यावर कर्नाटक भाजपाने काँग्रेसकडून देशविरोधी भावनांना खतपाणी घातल जात असल्याचा आरोप केला. काँग्रेसने राज्यातील राज्यसभेची जागा जिंकल्यानंतर पाकिस्तान अनुकूल घोषणाबाजी करण्यात आली, असा आरोप भाजपाने केला. त्यावर हरीप्रसाद यांनी वरील वक्तव्य केलं.

“ते पाकिस्तानसोबत असलेल्या आमच्या संबंधांबद्दल बोलतात. त्यांच्यानुसार, पाकिस्तान एक शत्रू देश आहे. पण आमच्यासाठी पाकिस्तान शत्रू नाहीय. तो शेजारी देश आहे. ते म्हणतात पाकिस्तान भारताचा शत्रू आहे, अलीकडेच त्यांनी लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. ते लाहोरमधील जिन्नांच्या कबरीवर गेले होते. तिथे जाऊन आडवाणी म्हणालेले की, जिन्नांसारखा धर्मनिरपेक्ष नेता नाही. त्यावेळी पाकिस्तान भारताचा शत्रू नव्हता का?” असं हरीप्रसाद विधान परिषदेत म्हणाले.

राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा का?

हरीप्रसाद यांच्या वक्तव्यावर कर्नाटक भाजपाने जोरदार टीका केली. पाकिस्तानने भारताविरुद्ध चारवेळा युद्ध पुकारलं, तरीही पाकिस्तानला शत्रू राष्ट्र मानत नसल्याबद्दल भाजपाने टीका केली. काँग्रेस पक्ष देशविरोधी भावनांच समर्थन करत असल्याचा भाजपाने आरोप केला. पाकिस्तानबद्दल काँग्रेसची काय भूमिका आहे? ते हरीप्रसाद यांनी सभागृहात स्पष्ट केलं. काँग्रेस नेते सयद नासेर हुसैन यांनी राज्यसभेची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्याचा भाजपाचा आरोप आहे. या विरोधात भाजपा आमदारांनी विधान परिषदेतील मोकळ्या जागेत आंदोलन केलं.