
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. यानंतर या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी विविध शिष्टमंडळं परदेशात गेली होती. ही शिष्टमंडळं परत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी संध्याकाळी आपल्या सरकारी निवासस्थानी शिष्टमंडळांच्या सदस्यांचे स्वागत केले. या शिष्टमंडळांच्या सदस्यांनी पंतप्रधानांना विविध देशांमधील त्यांच्या बैठका आणि अनुभवांची माहिती दिली.
शिष्टमंडळांमध्ये खासदार आणि अधिकाऱ्यांचा समावेश
या शिष्टमंडळांमध्ये विविध पक्षांचे खासदार माजी खासदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता. परदेश दौऱ्यांदरम्यान या शिष्टमंडळांनी दहशतवादाविरुद्ध भारताची ठाम भूमिका आणि जागतिक शांततेसाठी भारताचे प्रयत्न अधोरेखित केले होती. यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपली भूमिका मजबूत झाली.
दहशतवादावर पाकिस्तानचा पर्दाफाश करण्याचे काम
विविध देशांमध्ये गेलेल्या शिष्टमंडळांना दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश करण्याचे काम देण्यात आले होते. शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या सात खासदारांमध्ये काँग्रेसचे शशी थरूर, भाजपचे रवीशंकर प्रसाद, जेडीयूचे संजय कुमार झा, भाजपचे बैजयंत पांडा, द्रमुकच्या कनिमोझी करुणानिधी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांचा समावेश होता.
भारताने भूमिका जगासमोर मांडली
ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादाबाबत भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी ही शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्यात आली होती. या शिष्टमंडळाद्वारे भारताने दहशतवादाबाबत आपल्या धोरणाची माहिती दिली. आता सर्व सर्वपक्षीय शिष्टमंडळे देशात परतली आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी आज शिष्टमंडळाच्या सदस्यांची भेट घेत आहेत.
ऑपरेशन सिंदूर
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्धवस्त केले. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.