India Pakistan Conflict : आणखी काही तरी मोठं घडणार… पंतप्रधानांची भारत सरकारच्या सर्व सचिवांसोबत तातडीची हाय लेव्हल मिटिंग; काय काय घडलं?

या उच्चस्तरीय बैठकीत, पंतप्रधानांनी सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व मंत्रालयांनी केलेल्या नियोजनाचा आणि तयारीचा आढावा घेतला. तत्पूर्वी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि ऑपरेशन सिंदूर नंतरच्या एकंदर परिस्थितीची माहिती दिली.

India Pakistan Conflict : आणखी काही तरी मोठं घडणार... पंतप्रधानांची भारत सरकारच्या सर्व सचिवांसोबत तातडीची हाय लेव्हल मिटिंग; काय काय घडलं?
पंतप्रधानांची भारत सरकारच्या सर्व सचिवांसोबत तातडीची हाय लेव्हल मिटिंग
Image Credit source: social media
| Updated on: May 08, 2025 | 3:16 PM

पहलगाममधील नृशंस दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने नुकतंच ऑपरेशन सिंदूर राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत ते उद्ध्वस्त केले आणि त्यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईचे देशभरातील जनतेने आणि विविध देशांनीही समर्थन केलं असलं तरी या कारवाईमुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला असून जशास तसं उत्तर देण्याची भाषा पाकने केली आहे. याच पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर नंतर देशातील परिस्थितीचा, तयारीचा आढावा घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यानंतर, केंद्रीय गृहसचिवांनी पंतप्रधानांना भेटून परिस्थितीची माहिती दिली.

महत्वाची बाब म्हणजे, यानंतर, पंतप्रधानांनी सर्व प्रमुख विभागांच्या सचिवांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय तयारीशी संबंधित अलिकडच्या घडामोडी लक्षात घेऊन विविध मंत्रालयांमधील समन्वयाचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे. या हाय लेव्हल मीटिंगमुळे लवकरच आणखी काही तरी मोठं घडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या उच्चस्तरीय बैठकीत, पंतप्रधान मोदींनी विविध विभाग आणि सरकारी संस्थांमधील अखंड समन्वय आणि कामकाजात सातत्य राखण्याच्या गरजेच्या मुद्यावर भर दिला. तसेच सर्व विभागीय सचिवांनी त्यांच्या संबंधित विभागांच्या कामकाजाकडे आणि प्रोटोकॉलकडे विशेष लक्ष द्यावे,असेही पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी सचिवांना तयारी, आपत्कालीन प्रतिसाद आणि अंतर्गत संचार प्रोटोकॉलवर विशेष लक्ष देण्यास सांगितले. या बैठकीत, सचिवांनी सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण सरकारी दृष्टिकोन तसेच त्यांच्या संबंधित विभागांच्या योजनांची माहिती दिली.

आपसातील समन्वय कायम राखण्याचा सल्ला

सर्व मंत्रालयांच्या सचिवांनी तणाव आणि संघर्षाच्या या काळात एकत्र काम करण्याची आणि नवीन समन्वय ओळखण्याची(कॉर्डिनेशन) आणि त्यानुसार काम करण्याच्या प्रक्रिया मजबूत करण्याची गरज यावर भर दिला. आपण कोणत्याही प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहेत,असे सर्व सचिवांनी नमूद केलं. या बैठकीत इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. नागरी सुरक्षा यंत्रणा मजबूत करणे, चुकीची माहिती आणि बनावट बातम्यांविरुद्ध लढण्याचे प्रयत्न आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा सुनिश्चित करणे यांचाही त्यामध्ये समावेश होता. मंत्रालयांना राज्य अधिकारी आणि तळागाळातील संस्थांशी जवळून समन्वय राखावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

कोणत्या विभागांचे सचिव सहभागी ?

या बैठकीला कॅबिनेट सचिव, पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, संरक्षण, गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, माहिती आणि प्रसारण, ऊर्जा, आरोग्य आणि दूरसंचार यासारख्या प्रमुख मंत्रालयांचे सचिव उपस्थित होते. या संवेदनशील काळात सतत दक्षता, संस्थात्मक समन्वय आणि स्पष्ट संवाद साधा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, ऑपरेशनल तयारी आणि नागरी संरक्षणासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही केला.