कृषी कायद्याविरोधात हरियाणात राडा, मुख्यमंत्री येण्याआधीच स्टेजची तोडफोड, पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

| Updated on: Jan 10, 2021 | 4:33 PM

मनोहर लाल खट्टर कार्यक्रम स्थळी दाखल होण्याआधीच शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत भाजप सरकारचा विरोध केला (Police Lathi charge on haryana karnal farmers)

कृषी कायद्याविरोधात हरियाणात राडा, मुख्यमंत्री येण्याआधीच स्टेजची तोडफोड, पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज
Follow us on

चंदीगड : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण येताना दिसत आहे. कारण हरियाणात भाजपच्या किसान संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांनी प्रचंड गोंधळ घातला. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर कार्यक्रम स्थळी येण्याआधी स्टेजची तसेच खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. हा राडा इतका वाढला की, अखेर पोलिसांना शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करावा लागला (Police Lathi charge on haryana karnal farmers).

हरियाणाच्या करनाल येथील कैमला गावात आज (10 जानेवारी) भाजपकडून किसान संवाद कार्यकर्माचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे शेतकऱ्यांना संबोधित करणार होते. केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायद्यांचा किती फायदा आहे, याबाबत ते शेतकऱ्यांना माहिती देणार होते. मात्र, खट्टर कार्यक्रम स्थळी दाखल होण्याआधीच शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत भाजप सरकारचा विरोध केला. त्यांनी खट्टर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

या दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, शेतकरी ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्याचबरोबर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. गर्दी पांगावी यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांवर जलफवारे देखील केले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अखेर खट्टर यांचा दौरा रद्द करण्यात आला.

काँग्रेसचा खट्टर सरकारवर निशाणा

या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी खट्टर यांच्यावर टीका केली. “खट्टर सरकारने शेतकऱ्यांच्या महापंचायतीचं ढोंग करणं बंद करावं. अन्नदाताच्या भावनांशी खेळून कायदा बिघडण्याचा प्रयत्न बंद करा. संवाद करायचाच असेल तर गेल्या 46 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या अन्नदात्यांशी करा”, असं सुरजेवाला यांनी सुनावलं (Police Lathi charge on haryana karnal farmers).

हेही वाचा : Special story | ‘बचेंगे तो और भी लढेंगे’, पानिपतची लढाई ते शेतकरी आंदोलन, बुराडीचा रक्तरंजित आणि धगधगता इतिहास