रस्त्याची मागणी केल्यावर विचारली डिलीव्हरी डेट, भाजपा खासदाराची मुक्ताफळं ऐकली का ?

मध्य प्रदेशातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 8 गर्भवती महिला सरकारकडे पक्क्या रस्त्यांची मागणी करत आहेत. कच्च्या रस्त्यांमुळे रुग्णालयात पोहोचणे कठीण होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. मात्र त्यानंतर भाजप खासदार राजेश मिश्रा यांचीही प्रतिक्रिया समोर असून त्यांच्या वक्तव्याने नवा गदारोळ माजला आहे.

रस्त्याची मागणी केल्यावर विचारली डिलीव्हरी डेट, भाजपा खासदाराची मुक्ताफळं ऐकली का ?
लीला साहू
Image Credit source: social media
| Updated on: Jul 12, 2025 | 10:04 AM

देशातील, राज्यातील सामान्य लोकांच्या सेवेसाठी , त्यांची कामं व्हावीत म्हणून लोकप्रतिनिधी निवडून देतात, पण सामान्य जनतेच्या समस्यांशी खासदारांचं काही घेणंदेणं आहे की नाही असा प्रश्न पडावा, अशीच एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील रस्ताच्या मागणीची परिस्थिती आता अशा वळणावर पोहोचली आहे की भाजप खासदाराने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर लीला साहू हिला डिलीव्हरीची डेटही विचारली. एवढंच नव्हे तर पुढे ते असंही म्हणाले की डिलीव्हरीच्या एक आठवडा आधी ते लीला साहूला उटलून हॉस्पिटलमध्ये दाखल करतील. मात्र या विधानामुळे लोकांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यांच्या विधानावरून गोंधळ उडाल्यावर मात्र आता त्यांचा सूर बदलला आहे. आम्ही रस्ता बांधून देऊ असं अखेर त्यांनी आता म्हटलं आहे.

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील एका गावातील ८ गर्भवती महिलांनी सोशल मीडियावर मूलभूत गरजेची मागणी केली. नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या लीला साहूने देखील सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तिने रस्त्याअभावी रुग्णालयात जाणे किती धोकादायक आहे हे नमूद केलं होतं. मात्र लीलाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, भाजप खासदार डॉ. राजेश मिश्रा आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह यांनी विचित्र विधाने केली.

 

डिलीव्हरची तारीख सांगा

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर खासदार मिश्रा यांनी लीला यांना त्यांच्या डिलीव्हरच्या तारखेबद्दल विचारले आणि म्हणाले- तारीख सांगा, आम्ही तुम्हाला एक आठवडा आधी रुग्णालयात दाखल करू. तर, कोणीही सोशल मीडियावर काहीही पोस्ट केली, तर लगेच प्रत्येक मागणी मान्य करू का? असा सवाल तर मंत्री राकेश सिंह यांनी विचारला. सोशल मीडिया पोस्टच्या आधारे लगेच डंपर किंवा सिमेंट-काँक्रीटने रस्ता बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा इतर कोणत्याही विभागाकडे पुरेसे बजेट नाही, असं ते म्हणाले. मात्र भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांच्या अशा विधानांनंतर राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे.

सिधी जिल्ह्यात राहणारी लीला साहू गर्भवती आहे. तिची प्रसूतीची वेळही जवळ आली आहे. लीला गेल्या एक वर्षापासून तिच्या गावात पक्की रस्ता करण्याची मागणी करत आहे, परंतु आतापर्यंत तिची मागणी ऐकली गेलेली नाही. लीला म्हणाली, मी भाजपला मतदान केले, पण रस्त्याचे आश्वासन पूर्ण झाले नाही. डबल इंजिन सरकारकडून आशा होती, पण आम्हाला फक्त वेगवेगळी कारणं ऐकायला मिळाली. तिच्या व्हिडिओमध्ये, लीलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना तिच्या गावापर्यंत रस्ता बांधण्याचे आवाहन केले, जेणेकरून तिच्या आणि तिच्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही.

 

खासदार काय म्हणाले ?

लीलाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप खासदार डॉ. राजेश मिश्रा आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह यांचे विधान समोर आले. खासदार मिश्रा म्हणाले, रस्ता बांधण्यासाठी वेळ लागतो. विविध कारणांमुळे काम अनेक वेळा थांबते. खामकडे जाणारा रस्ता गेल्या 10 वर्षांपासून बांधला जात आहे, अजूनही काही काम बाकी आहे. जंगलामुळे अडथळे येतात. देव काही रस्ता बांधत नाही की, तो हात पसरतो आणि चमत्कार घडतो असं होत नाही. रामायणात आपण पाहिले की विश्वकर्माने चमत्कारिकरित्या एक नवीन शहर बांधले, परंतु प्रत्यक्षात असे घडत नाही, अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली होती. काँग्रेसला नेता सापडत नाही याचे मला दुःख आहे, म्हणून ते एका गर्भवती महिलेचा राजकारणासाठी प्यादे म्हणून वापर करत आहेत. मला काँग्रेसबद्दल वाईट वाटते, असेही ते म्हणाले.