
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सर्वात आधी पंतप्रधान आफ्रिकेतील घानामध्ये जाणार आहेत. त्यानंतर ते त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना आणि ब्राझील मार्गे नामिबियाला जाणार आहेत. या दौऱ्यापूर्वी एक खुर्ची चर्चेत आली आहे. विदेशातील संसदेत असणाऱ्या या खुर्चीवर भारत आणि भारतीय लोकांचा उल्लेख आहे. त्या देशातील संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. तसेच संसद सदस्यांसमोर भाषणही करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ दिवसांच्या विदेश दौऱ्यावर जात आहे. या आठ दिवसांत ते पाच देशांचा दौरा करणार आहेत. घानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे जाणार आहेत. त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी दिलेल्या आमंत्रणावरुन पंतप्रधान त्या देशाच्या दौरा करणार आहे. १९९९ नंतर भारतीय पंतप्रधान प्रथमच त्या देशात जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील दौऱ्यापूर्वी एक खुर्ची चर्चेत आली. त्याबाबत बोलताना परराष्ट्र मंत्रालयातील सचिव (दक्षिण) नीना मल्होत्रा यांनी सांगितले की, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या संसदेतील सभापतींची खुर्ची भारताने भेट म्हणून दिली होती. ही खुर्ची म्हणजे दोन्ही देशांमधील मजबूत लोकशाही आणि संसदीय परंपरा प्रतिबिंबित करते. परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी मागील वर्षी त्यांच्या भेटीदरम्यान या खुर्चीचा उल्लेख केला होता. तसेच त्या खुर्चीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
९ फेब्रुवारी १९६८ रोजी भारताने ही खुर्ची त्रिनिदाद आणि टोबॅगोला भेट म्हणून दिली होती. हा देश ३१ ऑगस्ट १९६२ रोजी ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाला होता. त्यामुळे भारताने या देशाच्या संसदेला एक खुर्ची भेट दिली. सहा दशकांपूर्वी दिलेल्या या खुर्चीवर आजही त्रिनिदाद आणि टोबॅगो संसदेचे सभापती बसतात.
त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच सुरीनामच्या संसदेला भारताने भेट दिलेली खुर्ची.
९ फेब्रुवारी १९६८ रोजी दुपारी १.३७ वाजता खुर्ची भेटवस्तू देण्याच्या समारंभाला सुरुवात झाली होती. त्यावेळी सभापती अर्नोल्ड थॉमस होते. ही खुर्ची विशिष्ट लाकडाने तयार केली आहे. त्यामुळे तिला देण्यास सहा वर्ष उशीर झाला. खुर्चीवर कोरीव काम करणाऱ्या दोन कारागिरांपैकी एक आजारी पडला होता. त्यामुळे खुर्ची तयार होण्यास जास्त काळ लागला. त्रिनिदाद आणि टोबॅगोप्रमाणे भारतानेही सुरीनामच्या संसदेला एक खुर्ची भेट म्हणून दिली होती.