
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला श्रीलंकेचा दौरा आटपून आज तामिळनाडूमध्ये पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनाथस्वामी मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो कारण मला रामनाथस्वामींची पूजा करता आली. या खास दिवशी 8,300 कोटी रुपयांची कांम जनतेला सुपूर्द करण्याची संधी मिळाली. या रेल्वे आणि रस्ते योजना तामिळनाडूमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याचं काम करतील. मी या विकास कामांसाठी येथील जनतेचं अभिनंदन करतो असं यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे.
रामेश्वरममध्ये रोड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरममध्ये रोड शो देखील केला. पंतप्रधान मोदी हे तामिळनाडू दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन केलं. हा पूल रामेश्वरम द्वीप आणि मुख्यभूमीला जोडला गेला आहे. या पुलामुळे लोकांचा प्रवास आता अधिक आरामदायी होईल, असं मोदी यांनी या पुलाच्या उद्घाटनावेळी म्हटलं. दरम्यान यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते.या पुलाच्या उद्घाटनानंतर मोदी यांनी तामिळनाडूमध्ये एका रेल्वेला देखील हिरवा झेंडा दाखवला. तसेच त्यांनी या सर्व विकास कामांचा आढावा देखील घेतला.यावेळी रामेश्वरममध्ये रोड शो देखील करण्यात आला.
दरम्यान रामेश्वरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य अशी सभा आयोजित करण्यात आली, या सभेची सुरुवात मोदींनी तामिळ भाषेतून वडक्कम ने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमध्ये आज तब्बल 8 हजार 300 कोटी रुपयांपेक्षाही जास्त किमतीच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन केलं. हा पूल सांस्कृतिक संदर्भाने खूप महत्त्वाचा असल्याचं मोदी यांनी यावेळी म्हटलं. देशात सध्या अनेक मोठ-मोठ्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. मुंबईमध्ये देशातील सर्वात मोठ्या अट सेतुची निर्मिती करण्यात आली आहे. मी रामेश्वरमच्या पवित्र भूमितून देशातील जनतेला रामनवमीच्या शुभेच्छा देतो, असं मोदींनी यावेळी म्हटलं.