असंच नाही म्हणतं की पहिली बेटी धनाची पेटी, मुलगीचा जन्म झाला अन् बाप कोट्यवधी झाला, काय घडलं?
Punjab Carpenter Lottery: पंजाबमध्ये असं काही तरी घडलं ज्यानंतर एक माणसाला थेट लॉटरीच लागली आणि तो कोट्यवधी झाला.

पंजाबमध्ये असं काही तरी घडलं ज्यानंतर एक माणसाला थेट लॉटरीच लागली आणि तो कोट्यवधी झाला. पेशाने सुतार असलेल्या २४ वर्षीय युधवीर सिंगला नुकतीच मुलगी झाली, जरी अनेक नातेवाईक ‘आम्हाला मुलगा हवा होता’ असे म्हणत होते. पण या मुलीने संपूर्ण कुटुंबात बदल घडवला. मुलीच्या जन्मानंतर २४ तासांच्या आत युधवीर सिंगने १.५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. आता सर्वांचा विश्वास आहे की त्याच्या मुलीने त्याच्या कुटुंबासाठी भाग्य आणले आहे. ‘द ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील बरेटा शहरात राहणाऱ्या युधवीरने पंजाब स्टेट डिअर २०० मासिक लॉटरीमध्ये पहिले बक्षीस जिंकले. त्याच्या मुलीचा जन्म ६ नोव्हेंबर रोजी झाला आणि विजेत्यांची घोषणा ७ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. मुलीच्या जन्माने वडिलांचे नशीब पालटले, म्हणून युधवीरने आपल्या मुलीचे नाव ‘बरकत’ ठेवले.
४ नोव्हेंबर रोजी, युधवीर आपल्या गरोदर पत्नी हरमनला वैद्यकीय तपासणीसाठी मानसा येथील रुग्णालयात घेऊन गेला. वाटेत त्याने बुढलाडा येथील लॉटरीच्या स्टॉलवरून एक तिकीट विकत घेतले. लॉटरीचे तिकीट विकत घेण्याचा त्याचा मुळीच विचार नव्हता. रुग्णालयात जाताना, मोबाईल फोन नंबर पोर्ट करण्यासाठी त्याला एका स्टॉलवर थांबावे लागले, म्हणून त्याने राज्य लॉटरीमध्ये आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. मात्र, याच तिकिटामुळे त्याला पुढे १.५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल याची त्याला कल्पना नव्हती.
युधवीरच्या लॉटरी खरेदी करण्याच्या निर्णयामुळे त्याची पत्नी नाराज होती, कारण त्याचे कुटुंब आधीच आर्थिक अडचणीत होते. रुग्णालय आणि वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी पैसे वाचवणे गरजेचे होते. आता, मुलीच्या जन्मानंतर जेव्हा युधवीरने १.५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपले नशीब बदलण्याचे श्रेय त्याने आपल्या मुलीला दिले. युधवीर म्हणतो, “मी तिचं नाव ‘बरकत’ ठेवलं आहे. तिने आमच्या घरात भाग्य आणलं आहे. मग आम्ही तिचं नाव दुसरं कसं ठेवू शकलो असतो?”