हम ‘आप’ के ‘सात’ नही, राघव चढ्ढा यांच्यासोबत केजरीवालांना धक्का देणारे सात खासदार कोण? नावं आली समोर; एका क्रिकेटपटूचाही समावेश
राज्यसभेत आम आदमी पक्षामध्ये मोठी फूट पडली आहे. राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पक्षाचे सात खासदार भाजपमध्ये सामील होणार आहेत. आता या सात खासदारांची नावे देखील समोर आली आहे.

आम आदमी पार्टीसमोर (AAP) एक मोठे राजकीय संकट उभे राहिले आहे. पक्षाचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी ‘आप’ सोडण्याची घोषणा केली आहे. चड्ढा यांच्यासोबतच संदीप पाठक आणि अशोक मित्तल हे दोन अन्य खासदारही भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार आहेत. या तिघांनीही एकत्रित पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. चड्ढा यांनी थेट आपल्या जुन्या पक्षावर निशाणा साधत म्हटले की, आम आदमी पार्टी आता आपल्या मूळ सिद्धांतांपासून पूर्णपणे भरकटली आहे. राघव चड्ढा यांनी असा दावा केला आहे की, हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रमजीत सहानी, राजेंद्र गुप्ता यांनीही त्यांच्यासोबत आम आदमी पार्टी सोडली आहे.
शुक्रवारी (२४ एप्रिल) आम आदमी पार्टीला मोठा धक्का देत राघव चड्ढा यांनी ही घोषणा केली. चड्ढा यांच्यासोबत स्वाती मालीवाल, अशोक मित्तल, संदीप पाठक, विक्रम साहनी, राजिंदर गुप्ता आणि हरभजन सिंग भाजपमध्ये सामील होणार आहेत. हे सर्वजण राज्यसभेत ‘आप’चे खासदार आहेत. राज्यसभेत ‘आप’चे एकूण १० खासदार आहेत. याचा अर्थ आता ‘आप’चे दोन-तृतीयांश राज्यसभा खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
अँटी डिफेक्शन लॉ (पक्षांतर बंदी कायदा) काय सांगतो?
भारताच्या पक्षांतर बंदी कायद्यानुसार (संविधानातील दहावी अनुसूची), जर एखाद्या पक्षात पडलेल्या फुटीला मान्यता हवी असेल आणि अपात्रता टाळायची असेल, तर राज्यसभेतील पक्षाच्या किमान दोन-तृतीयांश (२/३) सदस्यांनी एकत्र असणे आवश्यक आहे.
‘आप’चे राज्यसभेतील एकूण सदस्य = १०
पक्षदोष कायद्यांतर्गत फूट वैध मानली जाण्यासाठी किमान ७ खासदार एकत्र येणे आवश्यक आहे. राघव चड्ढा यांच्यासाठी ७/१० खासदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे, तरच पक्षांतर बंदी कायद्यातून वाचत भाजपमध्ये जाणे शक्य होईल. म्हणजेच, ‘आप’च्या राज्यसभा गटातील ७०% सदस्यांना एकत्र आणावे लागेल.
भाजपप्रती आपला विश्वास व्यक्त करताना राघव चड्ढा म्हणाले, “मी एक योग्य माणूस होतो जो चुकीच्या पक्षात अडकला होता. गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने असे धाडसी निर्णय घेतले आहेत, जे घेण्यास इतर पक्ष घाबरत होते. या नेतृत्वावर देशातील जनतेने एकदा नाही, तर तीनदा आपला अढळ विश्वास व्यक्त केला आहे.”