मोठी बातमी | राहुल गांधी यांना दिलासा, सूरत सत्र न्यायालयाकडून जामीनाला मुदतवाढ, पुढील सुनावणी कधी?

सूरत सत्र न्यायालयात राहुल गांधी यांच्या याचिकेवर काय सुनावणी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांना आज दिलासा मिळाला.

मोठी बातमी | राहुल गांधी यांना दिलासा, सूरत सत्र न्यायालयाकडून जामीनाला मुदतवाढ, पुढील सुनावणी कधी?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 03, 2023 | 4:08 PM

विनायक डावरूंग, सूरत (गुजरात): काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सूरत सत्र न्यायालयाकडून (Surat Sessions Court) आज मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सूरत येथील कनिष्ठ न्यायालयाने सुनावली होती.  राहुल गांधी यांनी याविरोधात आज सूरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. सूरतमध्ये सत्र न्यायालयात आज राहुल गांधी यांच्या जामीनावर काय सुनावणी होते, याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. विशेषतः देशभरातील काँग्रेसचे दिग्गज नेते आज सूरतमध्ये दाखल झाले होते. राहुल गांधी यांना बेल मिळणार का जेल, यावरून काँग्रेसची पुढील रणनीती आखली जाणार होती. मात्र सूरत कोर्टाकडून राहुल गांधी यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्या जामीनाला 10 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे.

काय आहे प्रकरण?

2019 साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. सगळ्या चोरांचं आडनाव मोदीच कसं असतं, असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. याविरोधात सूरत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. 23 मार्च रोजी सूरत कोर्टाने या प्रकरणी राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर त्यांना तत्काळ जामीन मंजूर झाला होता. तर 24 मार्च रोजी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी सदर कोर्टाच्या निर्णयाला सूरत सत्र न्यायालयात आव्हान दिलंय.

3 मे रोजी पुढील सुनावणी

सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका दाखल करून घेतली आहे. राहुल गांधी यांचा जामीन आणखी दहा दिवस म्हणजेच 13 वाढवण्यात आला आहे. तर सदर प्रकरणाची सुनावणी 03 मे रोजी घेण्यात येईल. 13  एप्रिल नंतर जामीनासंदर्भात काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कनिष्ठ न्यायालयाचा निकाल सूरत सत्र न्यायालयात कायम राहिला तर राहुल गांधी यांना पुन्हा 2 वर्षांची शिक्षा कायम राहू शकते. त्यानंतर राहुल गांधी पुढील कोर्टात आव्हान देऊ शकतात.

सूरतमध्ये काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन

दरम्यान, राहुल गांधी यांना आज सूरत सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळतो की जामीन नामंजूर होतो, याकडे देशभरातील काँग्रेस नेत्यांचं लक्ष लागलं होतं. यासाठीच देशातील काँग्रेसचे दिग्गज नेते आज सूरतमध्ये दाखल झाले होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज सूरतमध्ये दाखल झाल्यापासून काँग्रेसच्या दिग्गजांचा गोतावळा त्यांच्या आजूबाजूला होता. यानिमित्ताने काँग्रेसने गुजरातेत मोठं शक्तिप्रदर्शन केलं.