राहुल गांधी नकली खासदार, ते कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत…, हैदराबादमधून अमित शाहांचा हल्लाबोल
भाजपच्या वतीने सुरू असलेल्या ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता मिटाओ’ अभियानादरम्यान हैदराबादमध्ये एका सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजपच्या वतीने सुरू असलेल्या ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता मिटाओ’ अभियानादरम्यान हैदराबादमध्ये एका सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तेलंगणा राज्यातून आम्ही काँग्रेस पक्षाला मुळासकट उखडून टाकू असा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. राहुल गांधी हे एक नकली खासदार आहेत, ते कधीच एक असली खासदार आणि पंतप्रधान होऊ शकत नाही, असंही यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाकडे देखील लक्ष वेधलं, जर सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाला झुकवलं नसतं, तर आज हैदराबाद हा भारताचा भाग बनलाच नसता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाला गुडघे टेकवण्यास भाग पाडलं. त्यामुळेच हैदराबाद संस्थान भारताचा भाग होऊ शकला असं यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे. दरम्यान आज हैदराबादच्या रस्त्यांवर शेकडो नागरिक उतरले आहेत, रविवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत देखील एक रॅली झाली होती, राहुल गांधी यांनी असा दावा केला होता की ही काँग्रेसची ‘वोट बचाओ’ रॅली आहे. परंतु ती ‘वोट बचाओ’ रॅली नव्हती तर घुसखोरांना वाचवा रॅली होती, असा हल्लाबोल देखील यावेळी अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे.
काँग्रेसकडून एनपीआर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचा विरोध सुरू आहे. काँग्रेस एनपीआरला विरोध करून बांगलादेशी घुसखोरांना वाचवत आहे, आणि याच लोकांचं मतदान यादीमध्ये नाव कायम ठेवण्याचा काँग्रेसचा डाव आहे. मात्र मी हे स्पष्ट सांगतो की तुम्ही कितीही प्रयत्न करा, जोपर्यंत या घुसखोरांचं नाव मतदान यादीमधून वगळलं जात नाही, तोपर्यंत भाजप शांत बसणार नाही, असंही यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी विविध मुद्द्यांवरून देखील काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसला घुसखोर वाचवायचे आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.