
Indian Railways Third AC class: भारतीय रेल्वेतून कोट्यावधी प्रवासी रोज प्रवास करतात. अनेक जण सुखकार प्रवासासाठी आरक्षण करुनच प्रवास करतात. परंतु स्लीपर क्लासमध्ये जनरल तिकीटाचे प्रवासी बसतात. तर रेल्वेच्या थर्ड एसीची परिस्थिती स्लीपर क्लाससारखी झाली आहे. थर्ड एसीमधील प्रवाश्यांना काही सुविधा दिल्या जात नाही. चांगल्या सुविधा हव्या तर आता सेकेंड एसीचा पर्याय आहे. यासंदर्भात रेल्वेला मिळणारा महसूलसुद्धा समजून घेऊ या…
रेल्वे मंत्रालयातील आकडेवारीनुसार, मागील पाच वर्षांत एसी क्लासचा महसूल वाढला आहे. परंतु स्लीपर क्लासमधून मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. सन 2019-20 मध्ये रेल्वेला एसी क्लासमधून केवळ 36 टक्के उत्पन्न मिळत होते. त्यात एसी फर्स्ट, एसी सेकेंड, एसी थर्ड, एसी चेअरकार सर्वांचा समावेश आहे. सर्वाधिक उत्पन्न एसी थर्ड क्लासचे होते. सन 2024-25 मध्ये एसीचे उत्पन्न 54 टक्के झाले. एसी क्लासचे उत्पन्न दीड पट वाढले. आकडेवारीनुसार रेल्वेला मिळणाऱ्या 80000 कोटींच्या उत्पन्नापैकी एसी क्लासचे उत्पन्न 50669 कोटी आहे. म्हणजेच एसी क्लासचे उत्पन्न वाढत आहे.
नॉन एसी क्लासमधून सन 2019-20 मध्ये प्रवाशांकडून मिळालेला एकूण महसूल 58 टक्के होता. यामध्ये सेकंड क्लास, स्लीपर, नॉन-एसी चेअरकार, उपनगरीय गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या कमाईचा समावेश होता. परंतु 2024-25 मध्ये त्यात घसरण झाली आहे. हे उत्पन्न केवळ 41 टक्क्यांवर आले आहे.
2019-20 मध्ये एसी क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एकूण संख्या 18 कोटी होती. वर्षभरात 809 कोटी प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला. हा आकडा केवळ 2.2 टक्के होता. तर 2024-25 मध्ये ही संख्या वाढून सुमारे 38 कोटी झाली आहे.
एसी क्लासचे उत्पन्न वाढल्यानंतर रेल्वे नॉन एसी क्लासचे कोच वाढवत आहे. पुढील तीन वर्षांत 17000 कोच निर्माण करण्यात येणार आहे. हे सर्व कोच 2028 मध्ये तयार होतील. दरवर्षी 6000 कोच निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे 6 लाख जास्त प्रवाशी यामधून प्रवास करु शकतील.