भारतामध्ये सत्ता बदल अशक्य, दिल्लीमधील आंदोलनावर पाकिस्तानी तज्ज्ञांची प्रतिक्रिया, ज्ञानेश कुमारांबद्दल केला मोठा दावा
सध्या दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतल्यामुळे आता या आंदोलनाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

कॉकरोच जनता पार्टी आणि विरोधी पक्षांकडून सातत्याने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीच्या वतीने दिल्लीमध्ये मोठं आंदोलन उभारण्यात आलं. तर दुसरीकडे याच मुद्यावर काँग्रेसने देखील आक्रमक भूमिका घेतली असून, काँग्रेसकडून देखील ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. दरम्यान या आंदोलन काळात पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाने आता संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. विशेष म्हणजे भारतामध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाची पाकिस्तानमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानमधील राजकीय विषयाचे तज्ज्ञ तसेच ज्येष्ठ पत्रकार नजम सेठी यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मोठा दावा केला आहे. हे आंदोलन निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मोठं आव्हान आहे, परंतु भारतामध्ये सत्ता बदल करण्याची ताकद या आंदोलनात नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानमधील एका टीव्ही चॅनलने आयोजित केलेल्या टॉक शो मध्ये त्यांनी म्हटलं की, भारतीय निवडणूक आयोगाला संपूर्ण जगभरात मोठा मान आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिल्ली हे राजधानीचं ठिकाण आहे, त्यामुळे इथे पूर्वीपासून आंदोलन होत आलेले आहेत. मात्र सध्या जे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन मोठं आहे, दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, त्यामुळे जगाचं लक्ष या आंदोलनाकडे जाणं स्वभाविक आहे.
नजम सेठी यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे की, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे सत्ता बदलाबाबत बोलत आहेत. त्यांचं असं म्हणणं हे स्वाभाविक आहे. कारण त्यांना सरकारवर दबाव निर्माण करायचा आहे. मात्र भारतामध्ये सध्या जे सरकार आहे, ते कोसळेल असं कदापिही शक्य होणार नाही. सध्या स्थितीमध्ये भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाचं एक स्थिर आणि मजबूत सरकार आहे. त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट आहे की, भारतामध्ये सत्ता बदल होऊ शकत नाही.
नजम सेठी हे फक्त एक राजकीय विषयाचे अभ्यासकच नाहीत तर ते पाकिस्तानच्या पंजाब प्रातांचे काळजीवाहू मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. तसेच ते काही काळ पीसीबीचे चेअरमन देखील होते. ते या आंदोलनाबाबत बोलताना पुढे म्हणाले की, या आंदोलनामुळे भारतामध्ये सत्ता बदल अशक्य आहे. परंतु हे आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मोठं आव्हान ठरू पाहात आहे. त्यामुळे त्यांना कदाचित ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा लागेल.