
मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुज स्ट्रेट बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जगभरात मोठा इंधन तुटवडा जाणवत आहे. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. दरम्यान कच्च्या तेलाचे दर नियंत्रणात राहावेत आणि होर्मुज स्ट्रेट बंद केल्यामुळे जो कच्च्या तेलाचा वितरण पुरवठा खंडित झाला आहे, त्यातून मार्ग निघावा यासाठी अमेरिकेनं अनेक देशांना आता रशियाकडून तेलाची खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. भारताला अमेरिकेकडून 30 दिवसांची परवानगी देण्यात आली होती. मात्र भारतानं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे की, आम्हाला कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाहीये आम्हाला आमचं राष्ट्रहीत जिथे दिसत असेल, जिथे आम्हाला कमी दरात कच्चे तेल मिळेल तिथून आम्ही ते खरेदी करू.
दरम्यान रशिया हे पूर्वीपासूनच भारताचं मित्र राष्ट्र आहे. अमेरिकेनं टॅरिफ लावल्यानंतर तर रशिया आणि भारतामधील जवळीक आणखी वाढली. आता रशियाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. रशियानं भारताला मोठी ऑफर दिली आहे. रशियाने भारताला कच्च्या तेलासोबतच LNG चा पुरवठा करण्याची देखील तयारी दाखवली आहे. भारतामधील रशियाचे राजदूत डेनिस एलिपोप यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, रशिया भारताला एलएनजी देण्यास तयार आहे. प्रतिबंधामुळे गेल्यावेळी एलएनजी पुरवठ्याच्या करारामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या, पुरवठा खंडित झाला होता. मात्र आता रशिया पुन्हा एकदा भारताला एलएनजीचा पुरवठा करण्यास तयार आहे.
भाताची कंपनी GAIL ने रशियाची सरकारी तेल आणि गॅस पुरवठादार असलेली कंपनी गजप्रोमसोबत प्रति वर्षाला 2.5 मिलियन टन एलएनजी खरेदी करण्याचा वीस वर्षांसाठी करार केला होता. मात्र रशियानं युक्रेनसोबत युद्ध सुरू केल्यानंतर पाश्चिमात्य देशांकडून रशियावर अनेक नवे निर्बंध लादण्यात आले, रशियाची कंपनी असलेल्या गजप्रोमच्या जर्मन यूनिटला जर्मनिने आपल्या ताब्यात घेतलं. त्यामुळे एलएनजीचा पुरवठा थांबवण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा पुरवठा सुरू करण्याची तयारी रशियानं दाखवली आहे.