गाढ झोपेत असतानाच भल्या पहाटे ट्रेन भसाभसा पेटली, प्रवाशांच्या धाड धाड उड्या,प्लॅटफॉर्मवर प्रचंड खळबळ, नेमकं काय घडलं?

बिहारच्या सासाराम रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी प्रवासी ट्रेनला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत एक डबा पूर्णपणे जळून खाक झाला, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. अग्निशमन यंत्रणांच्या अभावामुळे आणि रेल्वेच्या सुरक्षा उपाययोजनांवरील निष्काळजीपणामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे आले. या घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

गाढ झोपेत असतानाच भल्या पहाटे ट्रेन भसाभसा पेटली, प्रवाशांच्या धाड धाड उड्या,प्लॅटफॉर्मवर प्रचंड खळबळ, नेमकं काय घडलं?
सासाराम रेल्वे स्टेशनवरील ट्रेनच्या डब्याला लागली आग
Image Credit source: social media
| Updated on: May 18, 2026 | 9:26 AM

सोमवारची सकाळ ही बिहारमध्ये अत्यंत खळबळीची ठरली. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील सासाराम रेल्वे स्टेशनवर सोमवारी पहाटेच्या सुमारास गोंधळाचा वातावरण होतं, कारण सासारामहून आरा मार्गे पाटणाच्या दिशेने जाणाऱ्या एका प्रवासी ट्रेनला अचानक आग लागली. ही धक्कादायक घटना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रेनच्या डब्याला लागलेल्याआगीमुळे प्लॅटफॉर्मवरील प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं. आपाल जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी धाडधाड उड्या मारत इकडेतिकडे धाव घेतली. थोड्याच वेळात आगीने रौद्ररुप धारण केलं आणि पाहता पाहता संपूर्ण बोगी आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. यामुळे प्रचंड गदारोळ माजला होता.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर थोड्याच वेळात, संपूर्ण डब्यात धूर पसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, सुदैवाने प्रवाशांना वेळेवर बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच, रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.

रेल्वे सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित

रेल्वेच्या डब्याला लागलेल्या आगीच्या या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी आणि प्रवाशांनी रेल्वे व्यवस्थापनाच्या परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, या रेल्वे स्थानकावर पुरेशा अग्निशमन यंत्रणांचा अभाव असल्यामुळे सुरूवातील आगीवर लगेच नियंत्रण मिळवता आलं नाही आणि ती वाढली. जर पाणी आणि अग्निशामक यंत्रांचा वेळेवर वापर केला असता, तर बरेचसे नुकसान टाळता आले असतं, असंही काही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

एवढंच नव्हे तर ट्रेनच्या रिफिलिंगच्या पाईपलाईनमध्ये पाणी नव्हतं,  शिवाय, स्टेशनवरील अनेक अग्निशामक सिलिंडरमधील गॅस संपला होता, असंही स्थानिकांनी सांगितलं. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आग विझवण्याच्या प्रयत्नांमध्ये सुरूवातील बराच अडथळा आला. रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे आणि सुरक्षा उपायांच्या अभावामुळे आग वेगाने पसरली आणि एक संपूर्ण डबा जळून खाक झाला.

यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव जळालेला डबा त्या ट्रेनपासून वेगळा काढून दुसरीकडे हलवण्यात आला. आग पसरू नये म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांनी इतर डब्यांचीही तपासणी केली. या घटनेदरम्यान स्टेशन परिसरात धुराचे काळे, दाट लोट पसरल्याचे दिसून आलं. मात्र यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली. अनेक प्रवाशांनी तर आपलं सामान सोडून जीव वाचवण्यासाठी उड्या टाकून पळ काढला. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर रेल्वे प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली.

शॉर्ट सर्किटमुळे लागली आग ?

मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं, असं आरपीएफ निरीक्षक संजीव कुमार यांनी सांगितलं. प्राथमिक तपासानुसार, गाडीला लागलेली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र असं असलं तरीही आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून एक तांत्रिक पथक तैनात केलं आहे. सुदैवाने या आगीत कोणताही प्रवासी जखमी झालेला नाही. असं असलं तरीही रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या गाडीच्या डब्याला आग लागल्यामुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

Follow Us