
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर आता भारत सरकारनं कठोर पाऊलं उचलली आहेत. भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा असा आदेश देखील देण्यात आला आहे. भारत सरकारच्या आदेशानंतर आता असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे की, पाकिस्तानी नागरिक असलेल्या आणि भारतात अवैध पद्धतीने आलेल्या सीमा हैदरला देखील पुन्हा पाकिस्तानला जावं लागणार का? यावर प्रतिक्रिया देताना सीमा हैदरचे वकील आणि मानलेला भाऊ एपी सिंह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हे प्रकरण पूर्णपणे वेगळं आहे, सीमा हैदरला उत्तर प्रदेश कोर्टाकडून जामीन मिळाला आहे, असं एपी सिंह यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले एपी सिंह?
एपी सिंह यांनी सीमा हैदर प्रकरणात मोठा दावा केला आहे. सीमा हैदरचे सर्व कागदपत्रे तपास यंत्रणेकडे आहेत. सीमा हैदरने भारतात आश्रय घेतला आहे. सध्या तिचा अर्ज राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. त्यामुळे तिला अशा परिस्थितीमध्ये देश सोडण्याची गरज नसल्याचं एपी सिंह यांनी म्हटलं आहे.पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात जे आदेश लागू केले आहेत, ते आदेश या प्रकरणात लागू होत नाहीत. हे प्रकरण पूर्णपणे वेगळं आहे, त्यामुळे या निर्णयाचा सीमा हैदर प्रकरणावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावाही तिच्या वकिलांनी यावेळी केला आहे.
सचिन मीणासोबत केलं लग्न
सीमा हैदर ही पाकिस्तानची नागरिक आहे.पब्जी गेम खेळत असताना तिची ओळख ग्रेटर नोएडामध्ये राहणाऱ्या सचिन मीणासोबत झाली. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर ती आपला पहिला पती गुलाम हैदर याला सोडून आपल्या मुलांसोबत नेपाळ मार्गे भारतात आली. तीने अवैध मार्गानं भारतात प्रवेश मिळवला. त्यानंतर तीने वकील एपी सिंह यांच्या मदतीनं सचिनसोबत लग्न देखील केलं. त्यांना आता एक मुलगा देखील झाला आहे. दरम्यान आता भारत सरकारनं सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे सीमा हैदरला देखील भारत सोडावा लागणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.