
लालकिल्ल्यावरच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावेळी राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत स्थान दिल्यावरुन शरद पवारांनी भाजपवर टीका केली आहे. तर याआधीच्या सरकारमध्येही विरोधी पक्षनेत्यांना जे स्थान दिलं जात होतं. त्याचप्रमाणे आसनव्यवस्था करण्यात आल्याचं उत्तर भाजपच्या आशिष शेलारांनी दिलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या परेडला विरोधी पक्षनेते राहुल गांधींना पाचव्या रांगेत बसवल्यावरुन विरोधक सरकारला सवाल करत आहेत. विरोधी पक्षनेता ही एक संस्था असून सरकार लोकशाहीची मुल्यं विसरल्याची टीका शरद पवारांनी केली आहे..
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधींना पाचव्या रांगेत स्थान देण्यात आलं. पहिल्या रांगेत न्यायमूर्ती चंद्रचूड, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह होते. त्यांच्या बाजूला इतर कॅबिनेट मंत्र्यांची आसनं होती. यानंतरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या रांगेत ऑलिम्पिक विजेते खेळाडू होते आणि पाचव्या रांगेत राहुल गांधींना स्थान देण्यात आलं होतं. राहुल गांधी हॉकीचे गुरजन सिंहच्या बाजूला होते. त्याच्या पुढच्या रांगेत मनु भाकर-सरबज्योत सिंह तर त्यापुढच्या रांगेत हॉकीच्या खेळाडूंचा समावेश होता.
सोशल मीडियात यावरुन सरकारला सवाल विचारले जावू लागले. देशाचा विरोधी पक्षनेता संविधानिक पद असूनही किंवा त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असूनही पाचव्या रांगेत का बसवलं गेलं. यावरुन टीका होऊ लागली आहे. 15 ऑगस्टच्या कार्यक्रमासह आसनव्यवस्थेची
जबाबदारी संरक्षण खात्याकडे असते. त्यामुळे एका रिपोर्टनुसार रक्षा मंत्रालयानं यावर म्हटलं की, प्रोटोकॉलनुसार विरोधी पक्षनेत्याला पुढच्या रांगांमध्येच बसवलं जातं. मात्र यावेळी ऑलिम्पिकपदक विजेत्या खेळाडूंना पुढच्या रांगेत स्थान देण्यात आलं. म्हणून राहुल गांधींना मागे बसावं लागलं.
विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्षाला किमान ५५ खासदार निवडून आणावे लागतात. त्यामुळे 2014 ते 2024 तब्बल १० वर्ष देशाच्या संसदेत विरोधी पक्षनेताच नव्हता. यंदा काँग्रेसचे 99 खासदार आल्यामुळे राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनले. मात्र स्वातंत्र्यदिनाच्या परेडला आसनव्यवस्थेवरुन वाद झाला.
काँग्रेसच्या आरोपांनुसार स्वतः राहुल गांधींनी आसनासाठी कोणतीही मागणी केली नव्हती. मात्र प्रोटोकॉलनुसार त्यांना योग्य स्थान देणं गरजेचं होतं. याशिवाय राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंसाठी सुद्धा पाचव्या रांगेतच स्थान देण्यात आलं होतं., असंही काँग्रेसनं म्हटलंय.
भारत सरकारचा पदानुक्रम जर बघितला तर त्यात पहिल्या स्थानी राष्ट्रपती, दुसरे उपराष्ट्रपती, तिसरे पंतप्रधान, चौथ्या स्थानी राज्यपाल, पाचव्या स्थानी माजी राष्ट्रपती, सहाव्या क्रमांकावर देशाचे सरन्यायाधीश आणि लोकसभाध्यक्ष, आणि सातव्या स्थानावर केंद्रीय कॅबिनेटमंत्री, मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान आणि संसदेतले विरोधी पक्षनेते यांना एकाच दर्जावर ठेवण्यात आलं आहे.