
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी २२ एप्रिल दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून सुरक्षा यंत्रणेत चूक झाल्याचे मान्य करण्यात आले. यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. आता याप्रकरणी राष्ट्रवादी पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे. काल बैठकीत जे काही निर्णय घेतले जातील, त्यात आम्ही सरकार सोबत आहोत. पण सरकारने हे अधिक गांभीर्याने पाहिलं पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पहलगाममध्ये केंद्र सरकारकडून सुरक्षा यंत्रणेत चूक झाल्याचे मान्य केल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. “दोन तीन गोष्टी आहे. काल काश्मीरमध्ये जे झालं, त्या प्रश्नाकडे सर्व देशवासियांनी एका विचाराने सरकार बरोबर राहिलं पाहिजे. त्यात राजकारण आणायचं नाही. अतिरेक्यांनी अॅक्शन घेतली ती भारत विरोधी आहे. देशाविरोधात जेव्हा अॅक्शन होते तिथे राजकीय मतभेद ठेवायचे नसतात. काल बैठक होती. सर्व पक्षीय होते. आमच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे होत्या. सर्व राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली याचा आनंद आहे. माझी विनंती आहे की, जे काही निर्णय घेतले जातील त्यात आम्ही सरकार सोबत आहोत. पण सरकारने हे अधिक गांभीर्याने पाहिलं पाहिजे”, असे शरद पवार म्हणाले.
“आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असं सांगितलं जात होतं. पण ठिक आहे, असं काही होत असेल तर आनंद आहे. पण उदाहरण पाहिलं आपण याचा अर्थ कुठे ना कुठे तरी अजूनही कमतरता आहे. ती कमतरता घालवली पाहिजे. देशावर हल्ला झाला असेल, सरकार गांभीर्याने निर्णय घेत असेल आणि कमतरता आहे असं मान्य करत असेल तर तातडीने ती कमतरता काढली पाहिजे. त्याही कामात आम्हा लोकांचं सरकारला सहकार्य राहील”, असेही शरद पवारांनी सांगितले.
“सरळ आहे ना. पहलगाम हे ठिकाण अधिक सेफ आहे. दोन तीन महिन्यांपूर्वी मी गेलो होतो. सातत्याने आपले लोक जातात. हे घडलं ते पहलगामला घडलं. याचा अर्थ दहशतवादी प्रवृत्तीविरूद्ध आपण यश मिळवलंय असा निष्कर्ष आपण काढत आहोत तर तो थोडा सावध काढला पाहिजे. आणि काळजी घेतली पाहिजे”, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.