शिवसेना ठाकरेंचीच हे घोषित करा, सिब्बल यांची सर्वात मोठी मागणी; शिंदेंना मोठं टेन्शन
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना चिन्हावरून सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. सिब्बल यांनी 'शिवसेना ठाकरेंचीच' हे घोषित करण्याची आणि 'धनुष्यबाण' चिन्ह गोठवण्याची जोरदार मागणी केली. पक्षांतर हे 'पाप' असून, शिंदे गटाने चिन्हाचा बेकायदेशीर वापर केला, असा युक्तिवाद त्यांनी केला.

शिवसेना ही ठाकरेंचीच आहे, हे घोषित करा. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना या नावाचा आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करून फायदे घेतले आहेत. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह कुणालाच देऊ नका. हे चिन्ह गोठवून टाका, अशी जोरदार मागणीच ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली. सिब्बल यांच्या या युक्तिवादाने शिंदे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर हा युक्तिवाद सुरू आहे. सुनावणीतील आपला शेवटचा युक्तिवाद संपवताना सिब्बल यांनी ठाकरे गटाची जोरदार बाजू मांडली आहे.
कपिल सिब्बल यांनी यावेळी ठाकरे गटाची बाजू मांडताना किहोटोमधील दोन परिच्छेद वाचून दाखवले. तसेच पक्षांतराला परवानगी मिळेल, अशा पद्धतीने दहाव्या परिशिष्टाचा अर्थ लावू नका, असं सिब्बल म्हणाले. पक्षांतराला परवानगी मिळणं हे पाप आहे. कर्नाटकाच्या निकालाताही हेच सांगण्यात आलं आहे. 19 जुलैनंतर आकडेवारी दाखवून त्यांच्याकडे समर्थन असल्याचं सांगत असाल तर हे एक प्रकारे पक्षांतराला प्रोत्साहन आहे, असं सिब्बल म्हणाले.
आम्हाला नाही तर त्यांनाही नको
यानंतर सिब्बल यांनी कोर्टापुढे काही मागण्या ठेवल्या. सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे त्यांनी शिवसेना ही ठाकरेंचीच असल्याचं मान्य करावं, अशी विनंती कोर्टाला केली. तसेच शिंदेला शिवसेनेचं चिन्ह देऊ नका. त्यांनी चिन्ह मिळवले आहे, हा न्याय हक्काचा मुद्दा नाही. धनुष्यबाण चिन्ह बेकायदेशीरपणे वारपले जात आहे. त्याचे त्यांनी फायदे घेतले आहेत. त्यामुळे हे चिन्ह गोठवलं गेलं पाहिजे. आम्हाला हे चिन्ह मिळत नसेल तर त्यांनाही ते मिळू नये. त्यापेक्षा हे चिन्ह गोठवलेलं बरं, असंही सिब्बल यांनी कोर्टात म्हटलं.
उद्या उठून कोणीही म्हणेल
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा दहाव्या परिशिष्टाचा दाखला दिला. विधानसभेत निवडून येण्यासाठी ज्या पक्ष नेतृत्वावर अवलंबून राहिले. त्याच नेतृत्त्वाला ते नाकारत आहेत. उद्या उठून कोणीही म्हणेल की, मी तुम्हाला माझा नेता मानत नाही. माझा स्वतःचा व्हिप असेल. मात्र, दहाव्या अनुसूचीमध्ये अशी तरतूदच केलेली नाही. खरे तर ज्या पक्षाच्या नेतृत्वाचा लाभ घेऊन तुम्ही निवडून आलात, त्याच नेतृत्वाला नंतर नाकारता येणार नाही, असं ही सूची सांगते, असंही सिब्बल यांनी सांगितलं.
गुवाहाटीचा उल्लेख
दरम्यान, यावेळी सिब्बल यांनी सुरत आणि गुवाहाटीचाही उल्लेख केला. फुटीनंतर आमदार आधी सुरतला गेले आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. 30 तारखेला त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. हे स्वतःच बरेच काही सांगून जाते. यासाठी कोणताही पुरावा सादर करण्याची गरज नाही. परिस्थितीचे वास्तव पाहिले पाहिजे, असं ते म्हणाले.