Snake Bite Insurance: साप चावल्यावर आरोग्य विम्यातून होतो फायदा? मृत्यूनंतर वारसांना भरपाई मिळते का?
Snake Bite Insurance: आरोग्य विम्यात आजार आणि अपघात झाल्यानंतर उपचारांचा खर्च मिळतो. पण सापाने दंश केल्यावर इन्शुरन्सचा फायदा होतो का? खासगी रुग्णालयात उपचाराचा खर्च मिळतो का? काय आहे त्याचे उत्तर?

Snake Bite Insurance: सध्या अनेक ठिकाणी पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. देशभरात सापाने दंश करण्याच्या घटना समोर येत आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी भरते. साप त्यांच्या बिळातून आणि सुरक्षित जागेतून बाहेर येतात. साप हे भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतात. अशावेळी शेतात काम करताना, अडचणीत काम करताना सापाने दंश केला तर संकट ओढावते. तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात नेल्यास सापाचे विष उतरवण्यासाठीचे औषध उपलब्ध असते. पण एखाद्यावेळी औषध नसल्यास आणि खासगी रुग्णालयात नेताना तब्येत बिघडल्यास मोठा खर्च येतो. यामुळे आरोग्य विमा योजनेत साप दंशावर लाभ मिळतो का? असा सवाल विचारल्या जात आहे.
अमेरिकेत नुकतेच असे प्रकरण समोर आले आहे. एका माणसाला सापाने दोनदा दंश केला. सापाचे विष निष्प्रभ करण्यासाठी त्याला 54 अँटीव्हेनम द्याव्या लागल्या. या उपचारासाठी तिथे त्याला 11 कोटींचे बिल हातात देण्यात आले. अमेरिकेत अशी स्थिती असेल तर भारतात आरोग्य विमा कंपन्या सर्प दंशावर विम्याचा लाभ देते का, असा सवाल अनेकांच्या मनात घोळतो. अथवा टर्म इन्शुरन्समध्ये नुकसान भरपाईचा दावा करता येतो का, असा सवाल विचारल्या जात आहे.
आरोग्य विम्यात भरपाई मिळेल की नाही?
आरोग्य विमा कंपन्या सर्व प्रकारच्या विमा योजनेत वैयक्तिक अपघात आणि काही आजारपणासाठी इन्शुरन्स देतात. आजारपणानुसार भरपाई देण्यात येते. त्यासाठी कोणताही प्रतिक्षा कालावधी नसतो. आरोग्य विमा योजनेत साप चावल्यावर रुग्णालयात भरती करण्यात आले तर अँटीव्हेनम इंजेक्शन, औषधं आणि गरज पडल्यास आयसीयूचा खर्च कंपन्या करतात. पण विमा खरेदी करताना याविषयीची सविस्तर माहिती कंपनीकडून घेणे महत्त्वाचे ठरते.
जीवन विम्यातही मिळतो लाभ?
आरोग्य विम्याशिवाय जीवन इन्शुरन्समध्ये कंपन्या वैयक्तिक अपघात प्रकरणात साप चावल्यावर मृत्यू ओढावल्यास भरपाई देते. जीवन विमा योजनेत अपघातासह इतर कारणासाठी विम्याचा लाभ मिळतो. उत्तरेतील काही राज्यात सरकार साप चावल्यानंतर मृत्यू ओढावल्यास वारसदारांना वैयक्तिक अपघात श्रेणीतून नुकसान भरपाई देते. उत्तर प्रदेशात सर्प दंशाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 4 लाख रुपये दिल्या जातात. पण त्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञाचा अहवाल आणि पोलीस ठाण्यातील एफआयआरची प्रति महत्त्वाची असते.
टर्म इन्शुरन्सचा नियम काय?
हेल्थ आणि जीवन विम्यासोबतच टर्म इन्शुरन्समध्ये साप चावल्यानंतर भरपाई देण्यात येते. सर्पदंशाविषयीचा कोणताही प्रतिक्षा कालावधी नसतो. विमा पॉलिसी खरेदी करताना सर्पदंशाविषयीचा विमा खरेदी करता येतो. त्यातंर्गत मृत्यू झाल्यास वारसदारांना, नातेवाईकांना विम्याचा लाभ देण्यात येतो. पण त्यासाठी अत्यावश्यक कागदपत्रे, वैद्यकीय अहवाल आवश्यक आहे.